पुण्यातील वडगाव उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मोटार पुलावरुन कोसळल्याने चौघे जखमी

marathinews24.com

पुणे – सिंहगड रस्ता परिसरात वडगाव उड्डाणपुलावर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्याबरोबर असलेला सहप्रवासी मित्र गंभीर जखमी झाला. भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार थेट उड्डाणपुलावरुन रस्त्यावर कोसळली. मोटारीतील ‘एअर बॅग’ यंत्रणा उघडल्याने चौघे जण बचावले. मोटारचालक तरुणासह चौघे जण जखमी झाले. मोटारीतील तिघांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले.

विमान प्रवासात प्रवासाचे दीड लाख रुपये लंपास – सविस्तर बातमी

कुणाल मनोज हुशार (वय २३, रा. चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी मित्र प्रज्योत दीपक पुजारी (वय २३, रा. चिंचवड) हा जखमी झाला आहे. अपघात प्रकरणात मोटारचालक शुभम राजेंद्र भाेसले (वय २३, रा. प्राधिकरण, निगडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातात मोटारचालक भोसले, त्याचे मित्र निखील मिलिंद रानवडे (वय २६, रा. ओैंध गाव), श्रेयस रामकृष्ण साेळंकी (वय २५, रा. चिंचवड), वेदांत इंद्रसिंग रजपूत (वय २८) हे जखमी झाले आहेत. आरोपी भोसले आणि त्याचे मित्र पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेला कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत हे महाविद्यालयीन शिक्षण (बीएस्सी काॅप्युटर) घेत आहेत. आरोपी भोसले याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम भोसले याच्या आईच्या नावाने मोटारीची नोंदणी झाली आहे. शुभम शुक्रवारी रात्री मोटार घेऊन बाहेर पडला. त्याने मित्र निखील, श्रेयस आणि वेदांत यांना बरोबर घेतले. चौघे जण रात्री उशीरा हिंजवडी भागातील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी मद्यपान केले. जेवण केल्यानंतर शुभम मित्रांना घेऊन मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गाने खेड शिवापूरला गेला. खेड शिवापूरहून मोटारचालक शुभम हा मित्रांसोबत पुन्हा भरधाव वेगात निगडीकडे निघाला होता. बाह्यवळण मार्गावरील वडगाव उड्डाणपुलावर पहाटे साडेतीनच्या सुमारास मोटारचालक शुभमचे नियंत्रण सुटले. दुचाकीस्वार कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत हे बाह्यवळण मार्गाने चिंचवडकडे निघाले होते. भरधाव मोटारीने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. अपघातात कुणालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच त्याच्याबरोबर असलेला मित्र प्रज्योत गंभीर जखमी झाला.

वेगमर्यादा ओलांडली

बाह्यवळण मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी वेगमर्यादा निश्चित केली आहे. वेगमर्यादेबाबतचे फलक जागोजागी लावले आहेत. मोटारचालक शुभम याने दुचाकीला धडक दिली. मोटारीचा वेग एवढा जोरात होता की, मोटार थेट वडगाव उड्डाणपुलावरुन खाली काेसळली. महागड्या मोटारीतील एअर बॅग यंत्रणा कार्यान्वित झाल्याने मोटारचालक शुभम याच्यासह त्याच्याबरोबर असलेले तीन मित्र बचावले. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या कुणाल आणि प्रज्योत यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. अपघातग्रस्त मोटारीतील चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मोटारीतील तिघांनी मद्यप्राशन केल्याचे उघड झाले.

कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी मे महिन्यात भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. अपघातापूर्वी अगरवालचा अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राने एका पबमध्ये मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

कीर्तनावरुन परत जाताना मृत्यू

अपघातात मृत्युमुखी पडलेला कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत हे धनकवडीतील श्री शंकर महाराज मठात शुक्रवारी रात्री आले होते. दोघे जण शंकर महाराजांचे भक्त आहेत. मंदिरात सध्या उत्सव सुरू आहे. उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात ते सहभागी झाले होते. कीर्तन झाल्यानंतर ते दुचाकीवरुन बाह्यवळण मार्गावरुन घरी परतत होते. त्या वेळी वडगाव उड्डाणपुलावर त्यांना भरधाव मोटारीने धडक दिली. जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर चिंचवड परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला.

वडगाव उड्डाणपुलावर २४ तासात दोघांचा मृत्यू

वडगाव उड्डाणपुलावर शुक्रवारी (२ मे) सकाळी सातच्या सुमारास पादचाऱ्याचा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण पावनोजी गावडे-पाटील (वय ३६, रा. गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार किरण हे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. किरण खासगी कंपनीत कामाला होते. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top