ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा वाढवली
marathinews24.com
पुणे – भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेले ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात सुरक्षितता वाढविण्यात आली. त्यानुसार आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणांसह राज्य सुरक्षा विभागाने सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून, परवानगीशिवाय शहरात ड्रोन, मायक्रोलाईट, पॅराग्लायडर, विमान, गरम हवेचा बलून किंवा कोणतेही रिमोट-कंट्रोल्ड फ्लाइंग डिव्हाइस उडवता येणार नाहीत. हे निर्बंध १४ मे ते १२ जून २०२५ पर्यंत लागू असतील. पुण्याचे सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी आदेश जारी केले आहेत.
तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून करणारा लातूरमधून अटकेत – सविस्तर बातमी
गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार दहशतवादी संघटना देशातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर हल्ला करण्याची योजना आखू शकतात. ड्रोन किंवा इतर उडणार्या उपकरणांचा वापर करून, दहशतवादी व्हीव्हीआयपी, धार्मिक स्थळे किंवा सार्वजनिक स्थळांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान देखील होऊ शकते. त्यापार्श्वभूमवीर पुणे पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत ही बंदी घातली आहे. संबंधित काळात ड्रोन किंवा हवाई उपकरण उडविण्यास बंदी घातली आहे. शहरातील सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस विभागालाच पाळत ठेवण्यासाठी ड्रोन उडवण्याची परवानगी आहे. जर एखाद्याला पोलिसांकडून विशेषतः लेखी परवानगी मिळाली असेल, तर तो ते उडवू शकतो. हा आदेश १४ मे रोजी रात्री १२:०१ वाजल्यापासून लागू झाला आहे. १२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आदेश लागू राहील. जर कोणत्याही व्यक्तीने या नियमाचे उल्लंघन केले तर त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाईल, ज्यामध्ये शिक्षा आणि दंड दोन्हीची तरतूद आहे. नागरिकांना आदेशाचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच आजूबाजूला काही संशयास्पद हवाई हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.