Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Amit Shah Pune Visit : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू; तळेगावच्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी दीड हजार कोटी

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा समृद्ध वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, देशाच्या पश्चिम विभागातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू करण्यात येत आहे. तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही बहुराज्य सहकारी संस्था दीड हजार कोटी रुपयांच्या वित्तीय सहाय्याने पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर आधारित आणि कमिशनविरहित ‘भारत टॅक्सी’ सेवेमुळे टॅक्सीचालकांना केवळ चालक न राहता स्वतःच्या सेवेचे मालक होण्याची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा – सविस्तर बातमी

तळेगाव येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन, पुण्यात सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक (सीआरसीएस) यांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पुण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार संजय (बाळा) भेगडे तसेच केंद्रीय सहकार सचिव आशिषकुमार भुटानी उपस्थित होते.

नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्थेच्या पुनरुज्जीवनातून सहकाराला औद्योगिक बळ

केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह म्हणाले, तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही महत्त्वाची बहुराज्य सहकारी संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी दीड हजार कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्यक आयडीएमसी आणि इतर वित्तीय संस्थाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून, या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२७ मध्ये उत्पादन सुरू होईल. सहकाराच्या माध्यमातून औद्योगिक व आर्थिक उपक्रमांना चालना देण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या संस्थेमध्ये सहकारी साखर कारखाने, इथेनॉल प्रकल्प आणि दूध डेअरी यांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री तयार केली जाणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना लागणारी यंत्रसामग्री देशातच उपलब्ध होण्यास मदत होईल. सहकार क्षेत्राची औद्योगिक क्षमता वाढण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. सहकारी संस्थांनी केवळ पारंपरिक व्यवसायांपुरते मर्यादित न राहता औद्योगिक उत्पादन क्षेत्रातही पुढाकार घ्यावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम विभागीय कार्यालयामुळे सहकारी संस्थांना प्रशासकीय सेवा सुलभ

पुण्यात सुरू करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाबाबत बोलताना श्री. शाह म्हणाले, बहुराज्य सहकारी संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच प्रशासकीय व नियामक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यालयामुळे सहकारी संस्थांच्या नोंदणीसह विविध प्रशासकीय कामकाजात सुलभता येईल. संस्थांच्या कामकाजातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. सहकारी संस्थांना त्यांच्या अडचणींसाठी दूरवर जावे लागणार नाही, तर पश्चिम विभागातील संस्थांना स्थानिक पातळीवरच आवश्यक मार्गदर्शन आणि सेवा मिळू शकतील.

महाराष्ट्राच्या भूमीत विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता यांच्यासारख्या सहकारमहर्षींनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवून ही चळवळ रुजविली. महाराष्ट्राला सहकार क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा उपयोग देशातील सहकारी चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी होणे आवश्यक आहे. पुण्यातील हे कार्यालय त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘भारत टॅक्सी’मुळे सारथीच होणार सेवेचा मालक

‘भारत टॅक्सी’ सेवेच्या प्रारंभाबाबत श्री. शाह म्हणाले, सहकाराच्या तत्त्वावर आधारित परिवहन सेवा विकसित करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या सेवेत टॅक्सीचालक म्हणजेच सारथी यांचा सहभाग, मालकी हक्क आणि आर्थिक भागीदारी यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पारंपरिक टॅक्सी सेवांमध्ये चालकांना मिळणाऱ्या उत्पन्नातून विविध प्रकारचे कमिशन द्यावे लागते. मात्र, सहकारी तत्त्वावर आधारित भारत टॅक्सीच्या माध्यमातून सारथींना त्यांच्या सेवेवर मालकी हक्क मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या व्यवस्थेमुळे चालकांना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच प्रवाशांनाही वाजवी दरात सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. सहकारी व्यवस्थेत सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि मालकीची भावना दृढ करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकार क्षेत्राला केंद्र सरकारकडून मोठे पाठबळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्र सरकारने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांवरील गेल्या अनेक वर्षांपासूनचा सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा कर माफ करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, त्यांना पुन्हा उभारी घेण्यास मदत झाली आहे.

तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे राज्यातील सहकारी साखर कारखाने आणि दूध डेअरी यांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री देशातच तयार होणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राला स्वदेशी उत्पादनाचे बळ मिळेल. पुण्यात सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक कार्यालय सुरू झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून सारथी स्वतःच मालक होणार असून, प्रवाशांना अत्यंत वाजवी दरात सेवा उपलब्ध होईल. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

सहकारातील महत्त्वाची संस्था पुन्हा सुरू होणे ही आनंदाची बाब – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडसारखी महत्त्वाची सहकारी संस्था पुनरुज्जीवित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या प्रकल्पामुळे शेकडो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि राज्यातील सहकार क्षेत्राला औद्योगिक बळ मिळेल.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना करमाफी देण्याचा तसेच मळीवरील कर कमी करण्याचा निर्णय सहकार क्षेत्रासाठी दिलासादायक ठरला आहे. या निर्णयांमुळे सहकारी संस्थांना नवसंजीवनी मिळाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण होते. सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्यामुळे या क्षेत्राला निश्चितच नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले. पुण्यात ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू होत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

पुण्यातील केंद्रीय निबंधक कार्यालयामुळे सहकार क्षेत्राला नवी दिशा – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देशातील तसेच महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक (सीआरसीएस) यांचे देशातील पहिले पश्चिम विभागीय कार्यालय पुण्यात सुरू होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यालयामुळे महाराष्ट्रासह पश्चिम विभागातील बहुराज्य सहकारी संस्थांना प्रशासकीय कामकाजासाठी मोठी मदत होणार आहे. सहकारी संस्थांचे कामकाज अधिक सुलभ व सक्षम होण्यासोबतच सहकार क्षेत्राच्या विस्ताराला चालना मिळेल. यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रासाठी अधिक समृद्धीचे दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या संस्थेच्या पुनरुज्जीवनाचे महत्त्व विशद करताना त्यांनी या प्रकल्पामुळे सहकारी साखर कारखाने, दूध डेअरी आणि इतर सहकारी संस्थांना आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

एनएचईसी आणि आयडीएमसीमध्ये सामंजस्यासाठी आशयपत्राची देवाणघेवाण

या कार्यक्रमात नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (एनएचईसी) आणि आयडीएमसी लिमिटेड यांच्यात सामंजस्याच्यादृष्टीने आशयपत्राची देवाणघेवाण करण्यात आली. तसेच ‘भारत टॅक्सी’च्या वतीने अशोककुमार मिश्रा, सुवर्णा सोनवणे, राजीव सुतार आणि दीपक विश्वकर्मा या चार सारथींना प्रतिनिधिक स्वरूपात समभाग प्रमाणपत्रांचे वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×