फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सोय; ग्रामीण भागातील पेन्शनधारकांनाही लाभ
marathinews24.com
बारामती – केंद्र व राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दरवर्षी पेन्शन सुरू ठेवण्यासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करणे आवश्यक असते. यासाठी भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या वतीने ‘Nationwide Digital Life Certificate Campaign 5.0’ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत असून, ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या जीवन प्रमाणपत्र काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेदरम्यान अनेक पेन्शनधारकांना बोटांचे ठसे स्पष्ट न उमटणे किंवा बायोमेट्रिक पडताळणीमध्ये अडचणी येत असल्याने जीवन प्रमाणपत्र सादर करताना त्रास होत होता. ही समस्या लक्षात घेऊन फेस ऑथेंटिकेशन अर्थात चेहरा ओळख पडताळणीद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही सेवा केवळ ७० रुपयांमध्ये उपलब्ध असून, बारामती टपाल विभागांतर्गत बारामती, इंदापूर, सासवड, दौंड आणि शिरूर तालुक्यांतील ग्रामीण भागातील शाखा डाकघर, उपडाकघर, बारामती मुख्य डाकघर तसेच पोस्टमन व ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
पेन्शनधारकांना पोस्टमन अथवा ग्रामीण डाक सेवकांना घरी बोलावून किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. यासाठी आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO No.) आणि मोबाईल क्रमांक ही माहिती आवश्यक आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व केंद्र, राज्य, रेल्वे तसेच विविध विभागांच्या पेन्शनधारकांनी जवळच्या पोस्टमन अथवा ग्रामीण डाक सेवकांशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, बारामती विभाग केतन डी. शित्रे आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शाखा व्यवस्थापक स्वप्नील सावंत यांनी केले आहे.






















