बालेवाडीतील घटना; आरोपीच्या हल्ल्यात तिघे जखमी
marathinews24.com
पुणे – Pune Crime News : नळावर पाणी भरताना झालेल्या वादातून एकावर चाकूने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना बालेवाडी भागात घडली. वादात मध्यस्थी करणाऱ्या तिघांवर आरोपीने हल्ला केला. करण राजू कापरे (वय १९, रा. बालेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रतीक संतोष मानकर (वय २१, रा. बालेवाडी) याला अटक करण्यात आली. आरोपीने केलेल्या हल्ल्यात केरबा नामदेव शिंदे (वय ४७, रा. मधुबन सोसायटीसमोर, अष्टविनायक चौक, बालेवाडी) यांच्यासह दोन अल्पवयीन जखमी झाले आहेत. याबाबत शिंदे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गॅरेज चालकावर वार करणारा अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी प्रतीक मानकर हा एका हाॅटेलमध्ये कामगार आहे. मानकर आणि कापरे हे अष्टविनायक चौकातील एका चाळीत राहायला आहेत. चाळीतील नळावर पाणी भरण्यावरुन करण आणि आरोपी प्रतीक यांच्यात वाद झाला होता. (Pune Crime News) १४ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. तक्रारदार शिंदे यांनी वादात मध्यस्थी केली. त्यानंतर आरोपी मानकर हा घरात गेला. स्वयंपाकघरातील सुरी घेऊन तो बाहेर आला. त्याने शिंदे, त्यांचा मुलगा आणि मित्राला शिवीगाळ करुन मारहाण केली.
मानकरने कापरे याच्यावर चाकूने वार केले. छातीत भोसकल्यानंतर कापरे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. ‘गंभीर जखमी झालेल्या कापरे याचा रविवारी रात्री खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेल्या कापरे याचा मृत्यू झाल्यानंतर या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली’, असे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.






















