३ लाखांचे मेफेड्रोन जप्त
marathinews24.com
पुणे – मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने लष्कर भागातून अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख सात हजारांचे मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल असा ४ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परवेज जाफर शेख (वय ३५, रा. मनीष पार्क, कोंढवा), नबील नूरमोहम्मद शेख (वय ३४, सध्या रा. साळुंखे विहार रस्ता, वानवडी, मूळ रा. लोणावळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुण्यात वेगवेगळ्या भागात घरफोडी; १५ लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी
शेख हे लष्कर भागात क्लोव्हर सेंटर परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी अमोल सरडे यांना मिळाली. पोलिसांनी क्लोव्हर सेंटरजवळील गल्लीत सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे मेफेड्रोन सापडले. दोघांकडून १०२ ग्रॅम मेफेड्रोन, दोन दुचाकी, तीन मोबाइल असा ४ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी मेफेड्रोन कोणाला विकणार होते, तसेच त्यांनी कोणाकडून मेफेड्रोन आणले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर, आशा भिंगारे, सहायक फौजदार विठ्ठल साळुंखे, अविनाश रेडके, तुषार साळुंके, अमोल सरडे, विशाल भिलारे, अतुल क्षीरसागर, अमरनाथ लोणकर यांनी ही कारवाई केली.






















