गोव्याच्या दोघांसह चौघे जेरबंद; चार पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे जप्त
marathinews24.com
पुणे – बेकायदा शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य टोळीचा वाघोली पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश केला. गोव्यातील दोघे तरुण पुण्यात येऊन पिस्तुले खरेदी करणार होते. मात्र, प्रत्यक्ष व्यवहार सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी चौघांना घेरले. या कारवाईत गोव्यातील दोघांसह पुण्यातील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे, दोन दुचाकी, मोबाईल आणि रोकड असा ४ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शुक्रवार पेठेत फ्लॅटमधून लॅपटाॅप, मोबाइल चोरीला – सविस्तर बातमी
आकाश ऊर्फ गज्या अशोक मोरे (वय २१, रा. वडगाव शेरी), मनिष दिलीप फेर्नाडिस (वय २६) आणि चंद्रेश्वर मल्लेशी चारी (वय २१, दोघे रा. चांदोर, मडगाव, गोवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मध्य प्रदेशातील सेंधवा येथील विशाल सिंह हा या टोळीला पिस्तुले पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
वाघोली पोलिसांच्या तपास पथकातील हवालदार प्रदीप मोटे यांना सोमवारी (दि. १६) शस्त्रविक्रीची माहिती मिळाली. गोवा पासिंगच्या दुचाकीवरून आलेले दोघे तरुण केसनंद परिसरात आकाश मोरेकडून पिस्तूल खरेदी करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक शिवशंकर राघू यांच्या पथकाने जोगेश्वरी पॅलेस परिसरात दोन पंचांसह साध्या वेशात सापळा रचला.
पावणे बाराच्या सुमारास जोगेश्वरी पॅलेसकडून डोंगराच्या दिशेने जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गोवा पासिंगची केटीएम दुचाकी उभी होती. त्याचवेळी नंबरप्लेट नसलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी तेथे आली. त्यावर मागे बसलेल्या आकाश मोरे याने पाठीवरील निळ्या रंगाची बॅग काढून त्यातील पिस्तुले दाखवण्यास सुरुवात केली.शस्त्रांचा व्यवहार सुरू होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी चौघांनाही घेरले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.
मध्य प्रदेशातून शस्त्रांचा पुरवठा
पोलिसांनी आकाश मोरे याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये चार देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे आणि एक रिकामे मॅगझिन आढळले. प्राथमिक चौकशीत ही पिस्तुले मध्य प्रदेशातील सेंधवा येथील विशाल सिंह याच्याकडून विकत आणल्याची माहिती आकाशने दिली. ही शस्त्रे गोव्यातील तरुणांना विकण्यासाठी आणल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे पुणे, गोवा आणि मध्य प्रदेश असे शस्त्र तस्करीचे धागेदोरे समोर आले आहेत. कारवाईत पिस्तुले, काडतुसे, मॅगझिन, मोबाईल, दोन दुचाकी आणि रोख रकमेसह ४ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुणे शहर पोलिसांच्या विशेष शाखेच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३(५), शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक शिवशंकर राघू पुढील तपास करीत आहेत.






















