सायबर सेलमधून बोलत असल्याची बतावणी करत महिलेला घातला ३० लाखांचा गंडा
marathinews24.com
पुणे – Digital Arrest Scam Pune : सायबर सेल ऑफ इंडियामधून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने महिलेला त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर होत असल्याचे सांगितले. त्याद्वारे अश्लील मेसेज पाठवले जात असून, मनी लॉड्रिंगसह दहशतवादी संघटनासाठी पैशांचा वापर झाल्याचे सांगितले. याप्रकरणी अटक करण्याची धमकी देउन महिलेला तब्बल ३० लाख रुपये ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४३ वर्षीय महिला सिंहगड रोड परिसरात राहायला आहे. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. सायबर सेल ऑफ इंडियामधून बोलत असल्याची बतावणी करुन आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे सांगितले. (Digital Arrest Scam Pune) तुमच्या बँकखात्यातून मनी लॉड्रिंग झाले असून, दहशतवादी कारवायांसाठी पैशांचे व्यवहार झाल्याचे बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यामुळे महिला घाबरुन गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. तुमचे बँकखाते तपासावे लागेल, असे म्हणत त्यांच्याकडून खात्याची माहिती घेतली.
सायबर चोरट्यांनी महिलेला बँक खात्यातून तब्बल ३० लाख रुपयांची रक्कम ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास सांगितले. अटकेची भीती मनात असल्यामुळे महिलेने संबंधिताच्या बँक खात्यात रक्कम वर्ग केली. मात्र, त्यांना संशय आल्यामुळे महिलेने संबंधिताला फोन केला असता तो बंद आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तत्काळ सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक समीर गायकवाड तपास करत आहेत.






















