एरंडवणे, मुंढव्यातील तीन पादचारी महिलांचे दागिने हिसकावले
marathinews24.com
पुणे– शहरातील विविध भागात रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलांसह नोकरदार महिलांना टारगेट करून दुचाकीस्वार चोरट्यांकडून दागिने हिसकावले जात आहेत. त्यामुळ महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. अशाच दागिने हिसकावण्याच्या तीन घटना एरंडवण्यासह मुंढव्यात घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात दोघा सराईतांची कारागृहात रवानगी; पोलीस आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी
रस्त्याने पायी जात असलेल्या जेष्ठ महिलांचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन महिलांच्य गळ्यातील १ लाख रूपये किंमतीचे दागिने हिसकावून नेले. महिलांनी आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. एकाच वेळी दोन ठिकाणी सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटनांमुळे अलंकार पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलांसह गुन्हे शाखेच्या पथकाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटना १७ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कोथरूडमधील वर्दळीच्या करिष्मा चौकात आणि एरंडवण्यातील दुसरी घटना डीपी रोडवरील सिद्धी लॉन्सजवळ घडली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार जेष्ठ महिला शिवणेत राहायला असून, १७ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास करिश्मा चौकातून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. त्यानंतर काही वेळाने चोरट्यांनी एरंडवण्यातील डीपी रस्त्यावरील वर्दळीच्या सिद्धी लॉन्सजवळ थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दोन्ही घटना अवघ्या काही वेळेत घडल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करीत आहेत.
रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १८ मे रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मुंढव्यातील केशवनगरात कोद्रे इमारतीजवळ घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदुपारी चोरट्याने वर्दळीच्या ठिकाणी महिलेला गाठून मंगळसूत्र हिसकावून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे. दुचाकीस्वार चोरट्यांच्या धुडगूसामुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.