१ लाख १० हजारांच्या वस्तू परत मिळवून दिल्या – येरवडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
marathinews24.com
पुणे – महिलेची रिक्षामध्ये विसरलेली पर्स शोधून काढत येरवडा पोलिसांनी प्रामाणिकपणे व तत्परतेने १ लाख ९ हजार रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू परत दिल्या. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुहासिनी चंद्रकांत धोत्रे (वय ४५ रा. सुभाष नगर, येरवडा) यांची पर्स शोधून परत दिली आहे.
तक्रादार सुहासिनी धोत्रे १९ मे ला दुपारी एक वाजता बँकेच्या कामानिमित्त रिक्षाने येरवडा गाडीतळ परिसरात गेल्या होत्या. बँकेत काम उरकल्यानंतर त्यांना लक्षात आले की त्यांनी पर्स रिक्षामध्येच विसरली आहे. पर्समध्ये सोन्याची साखळी व रोख रक्कम अशा एकूण १ लाख ९ लाख रुपयांच्या वस्तू होत्या. महिलेने तात्काळ येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक सुर्वे, पोलीस अंमलदार कांबळे यांना घटनेची माहिती दिली. महिलेने रिक्षा चालकाला गुगल पेच्या माध्यमातून पैसे दिल्याची माहिती मिळाल्यानंतर डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली.
तपास पथकाने गुगल पे वरील नंबरनुसार रिक्षा चालकाला शोधून काढले. त्यामधील पर्स सुरक्षित परत मिळवून दिली. पर्समध्ये सर्व वस्तू असल्याची खात्री करून महिलेस परत दिल्या. येरवडा पोलिसांनी तत्पर व प्रामाणिकपणे काम केल्यामुळे पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कामगिरी केली.