पोलिसांची मोठी कारवाई, ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – राज्यात गुटख्याच्या विक्रीसाठी बंदी असतानाही, छुप्या पद्धतीने वाहतूक करीत अमली पदार्थांची तस्करी करणार्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनीट पाचने पर्दापाश केला आहे. आरोपींच्या ताब्यातून तब्बल २० लाख ६८ हजारांचा आरएमडी पानमसाला आणि एम. सेंटेड टोबॅको गोल्ड गुटखा, ८० लाखांच्या सिगारेट मुद्देमालासह कंटेनर, १३ लाखांचा आरसीबी गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ६ जणांविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
क्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
अजिनाथ बबन धुमाळ (वय ३१ रा. घुलेनगर, केशवनगर मांजरी रोड, हडपसर) मदनसिंग चित्तो राम (वय ३८ रा. सुराली, कटवा जम्मु काश्मीर) राधेशाम बाबुलाल (रा. ढोले वस्ती मंतरवाडी, ता. हवेली ) मिथुन नवले (रा. गणेश पेठ पुणे) दौलतराम जांगीड (रा. दत्तकृपा हाईटस, मंतरवाडी) निखील आगरवाल (महाराष्ट्र फ्राईट कॅरीअर्स प्रा. लि. एम.एफ.सी चंद्राई वेअर हाऊस गोडाऊन मालक) यांच्याविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अमलदार पृथ्वीराज पांडुळे यांनी फिर्याद दिली आहे.
गुटखा, पानमसाला किंवा पानमसाला गठीत होऊ शकेल असा पदार्थ,स्वादिष्ट सुपारीचा साठा व वाहतूकीला राज्यात बंदी आहे. असे असतानाही आरोपींनी छुप्या पद्धतीने गुटख्याची तस्करी केली जात होती. दि.१९ मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मंतरवाडी कात्रज रोडवर उरळी देवाची परिसरात आरोपी अजिनाथ धुमाळ हा टेम्पोतून आरएमडी गुटख्याची वाहतूक करीत होता. त्याला अडवून पथकाने टेम्पोसह २० लाख ६८ हजारांचा गुटखा जप्त केला. आरोपी मिथून नवले याच्या सांगण्यावरून तो गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे उघडकीस आले. तसेच महाराष्ट्र फ्राईट कॅरीअर्स प्रा. लि. (एम.एफ.सी.) चंद्राई वेअर हाऊस मंतरवाडी उरळी देवाची हवेली याठिकाणी आरोप मदनसिंग राम हा दिल्लीतून आरोपी निखील आगरवाल याच्या सांगण्यावरून कंटेनरमधून गुटखा घेउन आला होता.
महाराष्ट्र फ्राईट कॅरीअर्स प्रा. लि. (एम.एफ.सी.) चंद्राई वेअर हाऊस गोडाऊनचा मॅनेजर दौलतराम जांगीड याच्या सांगण्यावरून तेथील लोड-अनलोड प्रमुख आरोपी राधेश्याम बाबुबला याने १२ लाख ९६ हजारांचा आसीबी गुटखा साठवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट पाचने आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १ कोटी १३ लाखांचा गुटखा, जप्त केला आहे. याप्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. आरोपींनी गुटखा कोठून आणला, ते गुटख्याची विक्री कोठे करणार होते, आणखी साथीदार कोण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.