कोंढवा पोलिसांकडून ४ तासात आरोपींना अटक
marathinews24.com
पुणे – फ्लॅट बघायला घेऊन गेलेल्या महिलेने तिच्याच मित्राला बाथरूममध्ये डांबून ठेऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा परिसरात बुधवारी घडली. याप्रकरणी प्रवीण जगन्नाथ लोणकर (३९, रा.कोंढवा खुर्द) याची सुटका केली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
हडपसरमधील हॉटेलच्या शौचालयात महिलेचे चित्रीकरण; आरोपी अटकेत – सविस्तर बातमी
सोनल ऊर्फ सोनी कापरे ऊर्फ कटके ऊर्फ अतुल रायकर ( व३५, रा. सनश्री सनटेक सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द), अतुल दिनकर रायकर (वय ३८), रॉबीन ऊर्फ रवी मंडल (वय २४, रा. कोंढवा खुर्द) आणि सुरेश ऊर्फ कुरेश कुमारस्वामी हान (वय ३१, रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यात प्रवीण जगन्नाथ लोणकर यांना लहानपणीची मैत्रीण सोनल ऊर्फ सोनी रायकर हिने मंगळवारी सायंकाळी तिच्या एनआयबीएम येथील फ्लॅट पाहण्याच्या व चहा पिण्याच्या बहाण्याने बोलवून घेतले. लोणकर घरी जाताच त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून जखमी केले. यावेळी तिचा पती अतुल रायकर व अन्य साथीदार हे फ्लॅटच्या बाहेर दबा धरून बसले होते. त्यांच्या मदतीने सोनीने त्यांना मारहाण करीत प्रवीणच्या तोंडात बोळा कोंबून त्याचे हातपाय दोरीने बांधून खोलीत डांबून ठेवले. त्यांच्याकडून एटीएम कार्ड व मोबाईल काढून घेत पैसे व घरातील दागिने न दिल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. प्रवीणच्याच मोबाईल वरून त्यांच्या पत्नीला मेसेज करुन ‘घरातील दागिने व पैसे काढून ठेव मी एकाला आपल्या घरी पाठवत आहे’ असे सांगितले.
नवऱ्याच्या मोबाईलवरून आलेल्या मेसेजची शंका आल्याने तिने व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. परंतु व्हिडिओ कॉल आला नाही. काहीतरी गडबड असल्याची शंका आल्यानंतर प्रवीण यांच्या बायकोने पोलिसांकडे धाव घेतली. यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर व पोलिस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख यांना कळवले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ याप्रकरणाची दखल घेऊन लोणकर यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
प्रवीण यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून सहायक पोलिस निरीक्षक मोहसीन पठाण, सुकेशिनी जाधव, राकेश जाधव यांच्यासह तपास पथकाचे अंमलदार लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांनी त्यांचा शोध घेतला. त्यानुसार एनआयबीएम रोडवरील सनश्री सनटेक सोसायटीतील फ्लॅटमधून डांबून ठेवलेल्या प्रवीणची सुटका केली. आरोपींविरोधात खंडणी, अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गावडे करत आहेत.