९४ मिलीमीटर पावसाची नोंद, वस्त्यांचा गावासोबत संपर्क तुटला
marathinews24.com
पुणे – मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली असून, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात ढगफुटीसदृश्य पाउस झाला आहे. अवघ्या काही तासांत तब्बल ९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, पावसामुळे गावासह वस्त्यावरील नागरिकांचा संपर्क तुटला असून, पाण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रवाह वाहत असल्याचेही दिसून आले आहे. त्यासोबतच पुणे-सोलापूर महामार्गाची एकाबाजूची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले.
बारामती तालुक्यात २२६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद-तहसीलदार गणेश शिंदे – सविस्तर बातमी
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी (दि.२५) स्वामी-चिंचोली गावासह खडकी, भिगवण, मळद, रावणगाव, कुरकुंभ परिसरात मुसळधार पाउस झाला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ओढे-नाल्यावरील पाणी वेगाने वाहत आहे. त्यासोबतच रस्त्यालगत वस्तीवर राहणार्या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, घरात पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याची नासाडी झाली आहे. स्थानिक तरूणांनी मदतकार्य राबवून संबंधित नागरिकांना पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, पावसाच्या पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे सर्व्हिस रस्त्यालगत उभी असलेली अलिशान मोटारही पाण्यात वाहून गेली आहे. याप्रकरणी गावचे सरपंच पूनम मच्छिंद्र मदने यांनी दौंड तहसिलदार यांच्यासोबत संपर्क साधून मदतीची मागणी केली.
ओढे-नाले तुडूंब, मुख्य गावचा संपर्क तुटला
अवघ्या काही तासांत झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधात्रिरपिट उडाली होती. विशेषतः आठवडी बाजार असल्यामुळे भिगवणला गेलेल्या नागरिकांना पुन्हा गावात परतणे अशक्य झाले आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असून, मुख्य गाव आणि वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्थानिक प्रशासनासह पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच तरूणांनी मदतकार्य सुरू केले असून, पाण्यात अडकलेल्या सर्व कुटूंबियाना बाहेर काढण्यात यश आले आहे.
गावासह आजूबाजूला मुसळधार पाउस पडल्यामुळे ओढे-नाल्यात प्रचंड पाणी वाहत असून, गावाचा पुणे-सोलापूर महामार्गालगतचा संपर्क तुटला आहे. वाड्या-वस्त्यांसह गावातील नागरिक सुरक्षित असून, पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे सर्व नागरिकांना सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत. ढगफुटीसदृश्य पावसाची तहसिलदारांना माहिती दिली असून, त्यांनीही मदतकार्य करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
– पूनम मच्छिंद्र मदने, सरंपच स्वामी चिंचोली, दौंड, पुणे