“पुण्यात खुनाच्या गुन्ह्यांत लक्षणीय घट पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या प्रयत्नांना यश
Marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासह गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच पुणे शहरात मार्च महिन्यात सर्वात कमी खुनाचे प्रकार घडले. यापूर्वी २०२१ मध्ये ५ खून झाले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस ठाणे प्रमुखांनी गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यात अपेक्षित यश मिळवले आहे.पोलिसांनी खून आणि खुनाचे प्रयत्न सारख्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी मेहनत घेतली आहे.
शहरातील खुनाचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. मार्च महिन्यात पुण्यात फक्त २ खुनाच्या घटना घडल्या. त्यातील एका घटनेत मुलाने बापाला कौटुंबिक वादातून मारले आहे. तर किरकोळ
कारणावरून मामाने भाचाला चाकूने वार करून ठार केले होते. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केली. दरम्यान, खुन, खुनाचे प्रयत्न, सराईत टोळ्यांचा उच्छाद, कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी जबाबदारी पार पाडली असल्याचे दिसून आले आहे.
बनावट कंपनीकडून १०४ कामगारांच्या ‘पीएफ’ वर घोटाळा – सविस्तर बातमी
शहरात गेल्या तीन महिन्यांमध्ये खुनाच्या घटनांमध्ये प्रमाण मोठ्या प्रमाणत घट झाल्याचे दिसून आले आहे. विशेषतः हद्दीत कोणताही गंभीर गुन्हा घडू नये यासाठी सक्रिय उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. बीट मार्शलऐवजी कॉप्स २४, पोलिस ठाण्यांसह चौक्यांवर देखील लक्ष केंद्रित केले असल्याने या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट होण्यास मदत झाली आहे.पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अपर आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त निखिल पिंगळे, संदीप सिंह गिल, स्मार्तना पाटील, हिम्मत जाधव, डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुन्हेगारी कमी करण्यावर भर दिला होता.
२०१६ ते २०२५ मार्च महिन्यातील झालेले खून
१) २०१६ – ६
२) २०१७ – ७
३) २०१८ – ६
४) २०१९ – ६
५) २०२० – ८
६) २०२१ – ५
७) २०२२ – ९
८) २०२३ – ६
९) २०२४ – ७
१०) २०२५ –
शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. त्यासोबतच खून, खुनाचे प्रयत्न, घरफोडी, दरोडे, यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आलेख कमी केला आहे. त्यामुळेच यंदा मार्च महिन्यात गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत खुनाचे प्रमाण कमी झाल्याचे आमच्या सर्व टीमचे यश आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त