‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ पुस्तकाचे प्रकाशन
marathinews24.com
पुणे – “ग्रामविकासाच्या आदर्श पॅटर्नचे चंद्रकांत दळवी यांनी साकारलेले प्रारूप गाव, तालुका, जिल्हा किंवा राज्यापुरते मर्यादित राहू नये. ग्रामविकासाचे हे ‘दळवी मॉडेल’ सर्वत्र पोहोचावे आणि त्यासाठी हे मॉडेल अभ्यासक्रमाचा भाग व्हावे. त्यातून प्रत्येकाला ग्रामविकासाची प्रेरणा व दिशा मिळावी”, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी केले. चंद्रकांत दळवी नावाच्या व्यक्तीने शून्यातून सुरवात केली. सातत्य, चिकाटी, संयम आणि लोकसहभागाचा मंत्र जपत ग्रामविकासाचे माॅडेल उभे केले. असे समविचारी दळवी मोठ्या संख्येने तयार व्हावेत, असेही पाटेकर म्हणाले.
देशभक्तीपर गाण्यांतून बंद्यांमध्ये जागविली नवप्रेरणा; येरवडा कारागृहात कार्यक्रम संपन्न – सविस्तर बातमी
माजी आयएएस अधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून परिपूर्ण व स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारुपाला आलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ (ता. खटाव) या गावाची प्रगतशील वाटचाल उलगडणार्या ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते. या पुस्तकाला नाना पाटेकर यांनीच प्रस्तावना लिहिली आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सह्याद्री फॉर्म्सचे विलास शिंदे होते. याप्रसंगी चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पीआरएम सॉफ्ट सोल्यूशन्सचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे, धर्मेंद्र पवार, अभिषेक दळवी, तबाजी कापसे, संजीव कोलगोड एस. बी. प्रॉडक्शन्सचे शंकर बारवे आदी उपस्थित होते. यावेळी ‘निढळ गाव: परिवर्तनाचा प्रवास’ या माहितीपटाच्या टीझर आणि पोस्टरचे अनावरण झाले. सत्व फाऊंडेशनच्या वतीने माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
नाना पाटेकर म्हणाले, “चंद्रकांत दळवी सातत्याने ४१ वर्षे हे काम करत आहेत. शासकीय सेवेतील महत्त्वाची पदे भूषवत असताना, तथाकथित विकास करणे दळवींना सहज शक्य होते. पण त्यांना अभिप्रेत ग्रामविकासाचे प्रारूप निराळे होते. सामाजिक एकोपा, लोकसहभाग आणि लोकवर्गणी यांच्या माध्यमातून त्यांनी ९० टक्के शासकीय योजनांच्या मदतीनेच ही किमया घडवून आणली आहे. त्यांच्या ग्रामविकासाला सामूहिकतेची जोड आहे. पराकोटीचे सातत्य, संयम, धीर आणि दळवींमधील नेतृत्वगुणांचे हे फलित आहे. समविचारी लोक जमवणे कठीण असते. समृद्धीची प्रत्येकाची कल्पनाही वेगळी असते.
अशा परिस्थितीत दळवी यांनी स्वतःपलीकडे जाणाऱ्या समाजसेवेचा प्रत्यय दिला आहे. समाजातील युवकांची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाणे आवश्यक आहे, त्यासाठी दळवींचे हे पुस्तक अभ्यासक्रमाचा भाग होणे आवश्यक आहे. यापुढे ग्रामविकासामध्ये नाम फाऊंडेशन दळवींच्या माडेलसोबत काम करेल.”
चंद्रकांत दळवी यांनी नाना पाटेकर यांचा ‘ग्रामीण भारतासाठी काम करणारे नायक’ असा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, “शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत असताना, राज्याची धोरणे ठरविण्याच्या महत्त्वाच्या कामात मला सहभागी होता आले. प्रत्येक पदावर काम करताना राज्याच्या हिताची एक तरी योजना ठरवण्याची संधी मिळाली. पण गावात प्रत्यक्ष काम करणे आव्हानात्मक होते. धोरणे चांगली असतील, तर विकासाचे प्रारूप लोकसहभागातून शक्य होते, याचे उदाहरण आता उभे राहिले आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने समाजकार्याचे माडेल उभे राहिले आहे. हे पुस्तक लवकरच इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध होईल. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामविकासाची अशी माॅडेल्स उपयोगी ठरतील. निढळ गावाच्या विकासाच्या ९० टक्के योजना शासकीय माध्यमातूनच राबविल्या आहेत.”
विलास शिंदे म्हणाले, “ग्रामीण भागात विकासाच्या संधी नाहीत; म्हणून स्थलांतर होते. हे चित्र बदलण्यासाठी व्यवस्थेत बदल अपेक्षित आहेत. हे बदल नेमके कसे आणि कुणी करायचे, याचे उत्तर दळवी यांच्या या पुस्तकातून मिळेल. गावातून बाहेर पडून गावासाठी काम करता येत नाही तर गावातच काम करावे लागते. त्यासाठी आपल्या गावाशी नाळ जुळावी लागते. दळवींनी हेच केले. त्यासाठी झोकून दिले. आता अशी मोजकीच गावे उदाहरणापुरती न राहता, राज्यातील ४७ हजार गावे या प्रक्रियेत यावीत, आणि चित्र बदलावे, हीच अपेक्षा आहे.
गजानन पाटील म्हणाले, “गावासाठी काम करायचे, तर चिकाटी, सातत्य लागते. अनेकांचा गावाशी संपर्कच तुटलेला असतो. दळवींनी हे जाणून गावांशी नाळ जुळवली. सर्वांना एकत्रित करत वर्षानुवर्षे काम केले आणि हे विकसित गावाचे प्रारूप आपल्यासमोर आणले आहे.”
रामशेठ ठाकूर म्हणाले, “दळवी यांचा हा पॅटर्न स्वीकारला, तर शहरांकडे धावणारे लोंढे थांबतील. शहरांची कुणाला आठवणही येणार नाही. गाव भौतिक, आर्थिक, भावनिकदृष्ट्या प्रत्येक समाजघटकाला जोडून घेऊन विकास प्रक्रियेत सहभागी होईल. हा आराखडा देशभरात उपयुक्त ठरणारा आहे.”
‘निढळ पटर्न’ हे ग्रामविकासाचे उत्तम दस्तऐवजीकरण असून, आगामी काळात ते दिशादर्शक ठरेल, असे पुस्तकाचे लेखक सुनील चव्हाण म्हणाले. कैलास कळमकर, भीमराव माने, मनोज गायकवाड, रामदास माने, संतोष ढोरे पाटील, राजेंद्र शिंदे, शंकर बारवे यांनीही मनोगत मांडले. सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संजीव कुलगोड यांनी आभार मानले.