विमानतळ पोलिसांची मोठी कामगिरी
marathinews24.com
पुणे – घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दीपक देविदास पपाले (वय ३५, रा. येरवडा, पुणे) याला एक वर्ष तीन महिने सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा गुन्हा २०२४ मध्ये विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. याप्रकरणी आरोपीला तातडीने अटक करून वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
एसबीआय बँक मॅनेजर बोलतोय… सायबर चोरट्याने केली जेष्ठ महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी
विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडी गुन्हयातील सराईत आरोपी दीपक पपाले याच्या मुसक्या आवळल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांनी पथकाच्या मदतीने आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासामुळे सराईत गुन्हेगार दीपकला अटकाव करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. संबंधित दोषारोपपत्र प्रभावीपणे सादर केल्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी पपाले याला सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस हवालदार रुपेश पिसाळ, कोर्टातील कामकाज प्रशांत माटे यांनी पाहिले. पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना चपराक बसली असून, न्यायप्रविष्ठ कारवाईद्वारे कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक अधोरेखित झाला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांच्या नेतृत्वाखाली काटेकोरपणे पार पाडण्यात आला. त्यामुळे सराईत आरोपीला शिक्षा होण्यास मदत झाली आहे.