हरवलेल्या वस्तूचा पोलिसांनी घेतला शोध, हडपसर पोलिसांकडून महिलेला गिफ्ट
Marathinews24.com
पुणे- सीएनजी भरण्यासाठी पंपावर गेलेल्या महिलेच्या गाडीतील पर्स दरवाजा उघडताच खाली पडल्याने गहाळ झाली. पर्समध्ये दीड तोळ्यांचे मंगळसूत्र, मोबाईल, हजार रुपये, महत्त्वाची कागदपत्रे होती. घरी गेल्यानंतर महिलेला गाडीमध्ये पर्स नसल्याचे लक्षात आले. त्यांनी शोध
घेतला असता पर्स सापडली नाही. त्यानंतर महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून महिलेला पर्स मिळवून दिली.
वारजे माळवाडी परिसरात तक्रारदार महिला १ एप्रिलला सीएनजी पंपावर गाडीत गॅस भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी महिलेची पर्स गहाळ झाली.
पोलिसांनी तात्काळ दखल घेत पोलिस अंमलदार अविनाश गोसावी यांनी पर्सचा शोध घेण्यासाठी सीएनजी पंप व अन्य मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांना पर्स सीएनजी पंपावर पडल्याचे दिसले. महिलेच्या पाठीमागे असलेल्या गाडीतील व्यक्तींनी पर्स उचलली होती. त्यानंतर पोलिसांनी गाडीच्या नंबरद्वारे मालक आणि चालकांशी संपर्क साधला असता, गाडी प्रवाशांसह लातूर येथे गेली होती. पोलिसांनी चालकाच्या नंबरवर सीसीटीव्ही फुटेज पाठवून गाडी हडपसर पोलिस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे बुधवारी (दि. २) रात्री गाडी पोलिस ठाण्यात आली. पोलिसांनी गाडीतील प्रवाशांकडून पर्स घेऊन ती सर्व ऐवजासह तक्रारदार महिलेला परत दिली.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली एसीपी अनुराधा उदमले, वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी यांच्यासह पथकाने केली आहे.