पर्वती पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील सहकारनगर भागात दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचे दागिने हिसकावून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मित्रमंडळ काॅलनी परिसरात दुचाकीस्वार चाेरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी (५ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याबाबत एका महिलेच्या मुलाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पतीकडून पत्नीच्या मित्राला मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
सहकारनगर क्रमांक दोन परिसरात दुसऱ्या एका घटनेत दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील मोहनमाळ हिसकावून नेल्याची घटना घडली. सहायक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत. Pune Crime सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सहकारनगर क्रमांक एक परिसरातून नातीला घेऊन निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांनी चेहरा रुमालाने झाकला होता, असे ज्येष्ठ महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या दुचाकीस्वार चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.
महिलेला मारहाण करुन दागिने हिसकाविणारा अटकेत
Pune Crime : महिलेला मारहाण करुन तिच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेण्यात आल्याची घटना काेंढव्यात घडली. याप्रकरणी पाेलिसांनी पसार झालेल्या चोरट्याला अटक केली. आसिफ सलीम शेख (वय २६, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार ४३ वर्षीय महिला कोंढवा परिसरात राहायला आहेत. त्या सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी शेखने महिलेला अडवले. महिलेला मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला. शेख तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार झालेल्या आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक विटे तपास करत आहेत.























