आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या दिशेने वीट मारुन जेसीबी चालकासह त्याच्यासोबत बसलेल्या तरुणाला जखमी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शाखा अभियंत्याने फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २३ नोव्हेंबरला दुपारी पावणेएकच्या सुमारास गंगा व्हिलेज सोसायटी परिसरात घडली आहे.
माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येत असून, २३ नोव्हेंबरला दुपारी पथक काळेपडळमधील गंगा व्हिलेज सोसायटी परिसरातील अतिक्रमण काढून टाकत होते. त्यावेळी आरोपीने शाखा अभियंत्यासह इतरांना शिवीगाळ केली. वीट फेकून जेसीबीचे नुकसान करीत चालकासोबत बसलेल्या एकाला जखमी केले. याप्रकरणी संबंधित शाखा अभियंत्याने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक रघुवीर खोडा तपास करत आहेत.
बसप्रवासात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, चोरट्याला अटक
पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणार्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना १४ नोव्हेंबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास गाडीतळ हडपसर परिसरात घडली आहे. राहूल नामदेव देडे (वय २१ रा. वैदूवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोणी काळभोर परिसरात राहायला असून, १४ नोव्हेंबरला कामानिमित्त हडपसर परिसरात आल्या होत्या. काम संपवून महिला गाडीतळ परिसरातून पीएमपीएल बसने लोणी काळभोरला जाण्यासाठी गाडीत प्रवेश करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी राहूल देडे याला ताब्यात घेउन अटक केली. याप्रकरणी पोलीस अमलदार बी. आर. खटके तपास करत आहेत.
कंपनीतून मॅकेनिकल कारट्रेज बॉक्सची चोरी
शहरातील हडपसर इंडस्ट्रीयल भागातील कंपनीच्या शटरमधून आतमध्ये प्रवेश करीत चोरट्याने तब्बल ३ लाख २५ हजारांचा मॅकेनिकल कारट्रेज बॉक्स चोरुन नेला आहे. ही घटना १६ नोव्हेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास हडपसरमधील टीसीआय एक्सप्रेस मधुबन सोसायटी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसर परिसरात राहायला असून, इंडस्ट्रीयल एरियात त्यांची कंपनी आहे. १६ नोव्हेंबरला चोरट्यांनी त्यांच्या कंपनीचे शटर उघडे असल्याची संधी साधून आतमध्ये प्रवेश केला. तब्बल सव्वा तीन लाख रुपये किंमतीचा नवीन मॅकेनिकल कारट्रेज बॉक्स चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप राउत तपास करत आहेत.























