अग्रवाल कुटुंबाचा नोटांचे हार घालून डान्स व्हायरल
marathinews24.com
पुणे – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात अलिशान पोर्शे गाडी चालवून तरुणीसह तरुणाला चिरडल्याची घटना मे २०२४ कल्याणीनगरमध्ये घडली होती. अपघातात तरुण- तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्यासह इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. दरम्यान, जामिनावर सुटका झाल्यानंतर अग्रवाल कुटुंबाने जल्लोष केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गळ्यात नोटांचा हार घालून आरोपी मुंबई से आया मेरा दोस्त या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असल्याचा दावा करण्यात आला आहे.
चांगल्या परताव्याचे आमिष पडले २६ लाखांना – सविस्तर बातमी
व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी विशाल अग्रवाल हे पत्नीसमवेत गळ्यात नोटांचे हार घालून डान्स करताना दिसत आहेत. “मुंबई से आया मेरा दोस्त.. गाण्यावर आरोपी कुटुंबीय जल्लोष करताना व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अपघातात दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला असताना आरोपींकडून जामीन मिळताच असा डान्स करणे उचित नाही, असा सुर नेटिझन्समध्ये आहे. दरम्यान, अल्पवयीन आरोपीसह त्याचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल, रक्तनमुना फेरफार प्रकरणातील काही डॉक्टर आणि इतर आरोपींवर विविध गुन्हे दाखल केले होते. यापूर्वी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना रक्तनमुने बदलल्याप्रकरणी अटक झाली होती. ही घटना १९ मे २०२४ रोजी कल्याणीनगर भागात घडली होती.अपघातात मध्य प्रदेशातील आयटी अभियंते अनीश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.
व्हायरल व्हिडीओ जुना असल्याची चर्चा
अलिशान मोटर अपघातील आरोपींनी गळ्यात नोटांचे हार घालून डान्स केला आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असून, तो आता व्हायरल झाला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून खातरजमा होऊ शकली नाही. मात्र, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.





















