आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) बाबत प्रश्न आणि उपाययोजनांचा आढावा
marathinews24.com
पुणे – Pune RMC Pollution Control : पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण या दोन्ही बाबींशी कोणतीही तडजोड होता कामा नये. विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही बाबी हातात हात घालून पुढे जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) बाबत प्रश्न आणि उपाययोजनांचा आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणविषयक विषयांचाही आढावा घेतला. यावेळी आमदार सुनील शेळके, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
Pune RMC Pollution Control उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पर्यावरण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असून, या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेता प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला बाधा पोहोचेल, अशा बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
राज्य शासन आणि केंद्र शासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेले नियम व कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभाग, यंत्रणा आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत सातत्याने बैठका घेऊन आढावा घ्यावा. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून पर्यावरणविषयक प्रश्नांची सोडवणूक करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
शाळा, रुग्णालये आणि निवासी परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर द्यावा. विकासकामे करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. नागरिकांचे आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत विकास या बाबींचा विचार करून सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करावे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) संदर्भातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.























