Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Tribal Heroes of India : जनजातीय गौरव सप्ताह निमित्त विशेष लेख

महाराष्ट्रातील आदिवासी स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणा; शौर्य, संघर्ष आणि बलिदानाची गौरवगाथा

marathinews24.com

पुणे – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा देशातील विविध समाजघटकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून घडलेला आहे. या इतिहासात आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध सावकार आणि जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध तसेच जल, जंगल आणि जमीनीवरील पारंपरिक अधिकारांच्या रक्षणासाठी आदिवासी समाजाने अनेक उठाव केले, महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून सातपुड्याच्या जंगलांपर्यंत आणि विदर्भातील गोंडवाना प्रदेशापर्यंत अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली.

दुष्काळसदृश परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरणाचा शेतकऱ्यांना आधार – सविस्तर बातमी

महाराष्ट्रातील आदिवासी स्वातंत्र्यवीर; राघोजी भांगरे – सहयाद्रीचा क्रांतिसूर्य

८ नोव्हेंबर १८०५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवगाव येथे महादेव कोळी समाजात जन्मलेल्या राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरुद्ध संघर्ष केला, ब्रिटिश प्रशासन, सावकारांचे शोषण आणि शेतकरी-आदिवासीच्या जमिनी बळकावण्याच्या प्रकारांविरुद्ध त्यांनी संघटित लढा उभारला. १८२८ पासून त्यांनी ब्रिटिश आणि सावकारांविरुद्ध उठावाचे नेतृत्व केले. पुणे, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात त्यांच्या संघर्षाचा प्रभाव होता. अखेर २ मे १८४८ रोजी ठाणे येथे त्यांना फाशी देण्यात आली. त्यांचे बलिदान महाराष्ट्रातील आदिवासी स्वाभिमानाचे प्रतिक आहे.

भागोजी नाईक- भिल समाजाचे शूर क्रांतिकारक

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या काळात भागोजी नाईक यांनी भील समाजाला संघटित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. अहिल्यानगर आणि खान्देश परिसरातील डोंगराळ भागात त्यांनी ब्रिटिश प्रशासनाला आव्हान दिले. आदिवासी समाजाचे पारंपरिक अधिकार आणि स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष इतिहासातील महत्वपूर्ण मानला जातो.

वीर बाबुराव शेडमाके गोंडवाना भूमीचे स्वातंत्र्यवीर

१२ मार्च १८३३ रोजी गोंड समाजातील कुटुंबात जन्मलेल्या बाबुराव शेडमाके यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात चांदा (सध्याचा चंद्रपूर) आणि गडचिरोली परिसरात ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले. ते मोलमपल्लीचे जमीनदार होते. त्यांनी स्थानिक गोंड आदिवासींना संघटित करून ब्रिटिश सैन्याशी संघर्ष केला. ब्रिटिशांनी त्यांना पकडून २१ ऑक्टोबर १८५८ रोजी फाशी दिली. त्यांचे बलिदान गडचिरोली आणि विदर्भाच्या प्रेरणादायी अध्याय आहे.

भिमा नाईक – खान्देशातील आदिवासी संघर्षाचे नेतृत्व

खानदेश आणि सातपुडा परिसरातील भील समाजाच्या ब्रिटिशविरोधी संघर्षात भिमा नाईक यांचे नाव महत्वाने घेतले जाते. १८५७ च्या उठावाच्या काळात त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रतिकार केला. आदिवासींच्या पारंपारिक हक्कांचे संरक्षण आणि शोषणकारी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष ही त्यांच्या आंदोलनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

खाज्या नाईक – सातपुड्यातील ब्रिटिशविरोधी योद्धा

भील समाजातील खाज्या नाईक यांनी खान्देश परिसरात ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. ब्रिटिश प्रशासनाच्या दडपशाहीविरुद्ध आणि आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी त्यांनी प्रतिकाराची भूमिका घेतली.

नाग्या महादू कातकरी – चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा

१९३० मधील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहात नाग्या महादू कातकरी यांनी सहभाग घेतला. ब्रिटिशांच्या वनविषयक निर्बंधांविरुद्ध झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. जंगलावरील पारंपरिक अधिकारांसाठी दिलेले त्यांचे बलिदान आदिवासी संघर्षाच्या इतिहासात महत्वाचे आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी वीरांगणा जिजाबाई भांगरे आदिवासी महिला संघर्षाचे प्रेरणास्थान

महाराष्ट्रातील आदिवासी महिला स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात जिजाबाई भांगरे यांचे नाव काही संशोधनपर लेखन आणि ऐतिहासिक उल्लेखांमध्ये आढळते. आदिवासी महिलांनी ब्रिटिशविरोधी संघर्षात पुरुषांच्या बरोबरीने सहभाग घेतला. अशा महिलांच्या कार्याचा अधिक शोध घेऊन त्यांचे योगदान इतिहासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे.

वारली आदिवासी महिला संघटित संघर्षाची परंपरा

१९४५ ते १९४८ या काळात ठाणे जिल्ह्यात झालेल्या वारली आदिवासी उठावात महिलांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. जमीनदारांचे शोषण, वेठबिगारी, अन्यायकारक मजुरी आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध वारली समाजाने संघटित आंदोलन केले. या संघर्षात महिलांनी मोर्चे, सभा, संघटन आणि प्रतिकारामध्ये सक्रिय भूमिका बजावली. वारली महिलांचा हा संघर्ष आदिवासी स्त्रीशक्तीचे महत्वपूर्ण उदाहरण आहे.

आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील व्यापक योगदान

महाराष्ट्राबरोबरच देशातील आदिवासी समाजाने स्वातंत्र्यलढयात मोलाचे योगदान दिले. भगवान बिरसा मुंडा यांनी १८१९-१९०० मध्ये उलगुलान अर्थात महान उठाव उभारला, संथाल उठावात सिदधो, कान्हू, चांद आणि भैरव मुर्मू यांनी नेतृत्व केले. फूलो आणि झानो मुर्मू यांनी वीरांगणा म्हणून सहभाग नोंदवला, तिलका मांझी, टंटया भिल्ल, राणी गेदिन्ल्यू, तिरोत सिंग आणि कोमाराम भीम यांनीही ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला.

राणी दुर्गावती यांनी १५६४ मध्ये मुघल सैन्याविरुद्ध गोंडवाना राज्याच्या संरक्षणासाठी लढा देत बलिदान दिले. त्यांच्या संघर्ष ब्रिटिशकालीन नसला तरी गोंडवाना इतिहासातील आदिवासी शौर्य आणि स्वाभिमानाचे महत्वपूर्ण प्रतिक आहे.

झलकारीबाई यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला. त्या कोरी समाजातील वीरांगणा होत्या. त्यांचा उल्लेख भारतीय स्वातंत्र्यसमरातील वीरांगणा म्हणून करणे ऐतिहासिकदृष्ट्या योग्य आहे.

आदिवासी स्वातंत्र्यवीरांचा वारसा जपूया

आदिवासी समाजाचा स्वातंत्र्यलढा हा केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संघर्ष नव्हता, तर तो जल, जंगल, जमीन, संस्कृती, स्वाभिमान आणि पांरपरिक अधिकारांच्या संरक्षणासाठीचा लढा होता. या समाजाने देशाला एकता, सामूहिक संघर्ष, निसर्गसंवर्धन आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.

आदिवासी स्वातंत्र्यवीरांची चरित्रे शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करणे, त्यांच्या स्मारकांचे जतन करणे, संशोधनपर ग्रंथ प्रकाशित करणे आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचवणे ही काळाची गरज आहे.

आदिवासी वीरांचा इतिहास म्हणजे शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचा इतिहास ! या महान क्रांतिकारकांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन आणि त्यांच्या विचारांना मानाचा मुजरा !

श्रीमती विजया पंडुरे,
संशोधन अधिकारी,
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×