कुणाल राजगुरू यांचा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती पूर्व विभागाच्या अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा संपन्न
marathinews24.com
पुणे – भारतीय जनता पक्ष फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रभाव संपवून मनुस्मृती वादी विचार पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला. संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असून, संविधानाऐवजी मनुस्मृतीचे विचार आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन परिस्थितीचा संयुक्त सराव यशस्वी – सविस्तर बातमी
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती पूर्व विभागाच्या अध्यक्षपदी कुणाल राजगुरू यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पदग्रहण सोहळ्यात डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, माजी नगरसेविका लता राजगुरू, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश सरचिटणीस अमीर शेख, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, “पक्षाने कुणाल राजगुरू यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवून त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या सारख्या तरुणांमुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणि नवी ऊर्जा निर्माण होत आहे. तरुणांचा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला पाठिंबा वाढत आहे. कुणाल राजगुरू अनुसूचित जाती विभागाची मजबूत टीम उभी करून काँग्रेसचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवतील, असा विश्वास आहे.”
“फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावर काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. काँग्रेसचा विचार हा पक्षाच्या डीएनएमध्ये आहे. मात्र, भाजपला ही विचारधारा सहन होत नसून विविध मार्गांनी मनुस्मृतीवादी विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काँग्रेस पुढे घेऊन जात असून तो अधिक मजबूत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कुणाल राजगुरू यांच्यासारख्या लढवय्या तरुणांची पक्षाला गरज आहे,” असेही कदम यांनी सांगितले.
कुणाल राजगुरू म्हणाले, “माझ्यासारख्या तरुणावर अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून काँग्रेसचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजपच्या धर्मांध आणि मनुस्मृतीवादी विचारांना विरोध करून काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा बुलंद करण्यासाठी तरुणांचा काँग्रेसला वाढता पाठिंबा मिळत आहे.”
अनिरुद्ध वनकर म्हणाले, “आंबेडकरवादी विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि सामाजिक समतेचा पाया आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष या पायालाच धक्का देण्याचा प्रयत्न करीत आहे. हा विचार मजबूत करण्यासाठी तरुण काँग्रेसला पाठिंबा देत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला तरुणांचा वाढता पाठिंबा हे समाजातील बदलत्या मानसिकतेचे लक्षण आहे. काँग्रेसला अधिक मजबूत करण्यासाठी कुणाल राजगुरू यांच्यासारख्या तडफदार नेतृत्वाची गरज आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल राजगुरू यांनी केले. लता राजगुरू यांनी आभार मानले, तर विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. (Vishwajeet Kadam)























