मंगळवार पेठेतील घटना; दोघे अटकेत
marathinews24.com
पुणे – किरकोळ वादातून सराइतांकडूून मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना मंगळवार पेठेत मध्यरात्री घडली. सुदैवाने गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. याप्रकरणी सराइतांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी रोहित माने (वय ३०, लोहियानगर), कासीम असीफ अन्सारी (वय २३ रा. लोहियानगर) यांना अटक केली आहे. किरण केदारी (वय ३७, रा. गोखलेनगर) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात नवविवाहितेचा विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास केदारी हा मित्र शाम गायकवाड, अश्फाक शेख, संतोष कांबळे यांच्याबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी माने आणि अन्सारी तेथून दुचाकीवरुन चकरा मारत होते. केदारी आणि त्याच्या मित्रांनी दुचाकीस्वार मानेला जाब विचारला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. अन्सारी याने कंबरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले. केदारी यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली.
त्यानंतर अन्सारीने दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर केदारी आणि त्याच्याबरोबर असलेले मित्र घाबरले. आरोपी तेथून पळाले. काही वेळानंतर रोहित माने तेथे पुन्हा आला. आपल्याला प्रकरण मिटवायचे आहे, असे सा्ंगितले. चौघांनी माने याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या अन्सारीला पकडले. दोघे जण सराइत असून, त्यांनी पिस्तूल का बाळगले, तसेच कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहेत.