30 जून ते 2 जुलै या कालावधीत श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठात कार्यक्रम; मंत्रालय येथील मठाधीपती डॉ. श्री श्री सुबुधेंद्र तीर्थारू यांची विशेष उपस्थिती
marathinews24.com
पुणे – जगत्गुरू श्रीमान मध्वाचार्य मूळ महासंस्थानतर्फे श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांचा 240वा आराधना महोत्सव सोमवार, दि. 30 जून ते बुधवार, दि. 2 जुलै या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालय (रायचूर) येथील मठाधीपती डॉ. श्री सुबुधेंद्र तीर्थारू यांची विशेष उपस्थिती असणार आहे. महोत्सवादरम्यान श्रीपादंगळवरू यांचे भक्तांना आशीर्वचन लाभणार आहे.
तीन दिवसीय आराधना महोत्सव पुण्यातील सदाशिव पेठेतील लक्ष्मी रोडवरील नांजनगुडू श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवानिमित्त दि. 29 जून रोजी सायंकाळी 5 वाजता ध्वजारोहण, प्रार्थनाउत्सव, गौपूजा आणि धनधान्य पूजा असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मुख्य महोत्सवाला सोमवार, दि. 30 जून रोजी पूर्व आराधनेने सुरुवात होणार असून दि. 1 जुलै रोजी मध्य आराधना आणि दि. 2 जुलै रोजी उत्तर आराधना होणार आहे. आराधना महोत्सवात फलपंचामृत, अष्टोत्तर पारायण, संस्थानपूजा, हस्तोदक, महामंगलाराती, भजन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम सकाळी 5:30 ते रात्री 8 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत.
दि. 30 जून व दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता तर दि. 2 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता रजत रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. 30 जून रोजी कुमारी अभिज्ञा रघुनंदन यांची दासवाणी, दि. 1 जुलै रोजी पंडित रघुनंदन पणशीकर यांचे हिंदुस्तानी शास्त्रीय गायन आणि दि. 2 जुलै रोजी कृती नरसिंम्हाचार कुर्डी दासवाणी सादर करून आपली सेवा रुजू करणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम तीनही दिवस सायंकाळी 6 ते 7 या वेळात होणार आहेत.
पूर्व पिठीका..
श्री मध्वाचार्य यांचे 24वे उत्तराधिकारी संत श्री वरदेंद्र तीर्थ स्वामी यांचे पेशवाईच्या काळात पुण्यात आगमन झाले. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्वानांच्या सभेत महान अद्वैत विज्ञानी व न्यायाधीश श्रीरामशास्त्री यांच्यासमवेत झालेल्या वादविवादात श्री वरदेंद्र तीर्थ स्वामी अव्वल ठरले. रामशास्त्रींनी मान्य केल्याप्रमाणे स्वत:चे घर आणि सर्व संपत्ती श्री वरदेंद्र तीर्थ स्वामी यांच्याकडे सुपुर्द केली व स्वत: काशी येथे प्रयाण केले. पुण्यातील भक्तांनी स्वामीजींचे कौतुक केले व त्यांना विशेष सन्मान दिला. या पावन वास्तूत दरवर्षी आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.