जिल्ह्यातील कृषीच्या सर्वांगीण विकासाकरिता शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
marathinews24.com
बारामती – पीक लागवडीबाबत पूर्वतयारीपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञान व निर्यातक्षम उत्पादन करण्याच्यादृष्टीने शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.
कृषी विभागाच्यावतीने शुक्रवारी (9 मे) तालुका फळरोपवाटिका कन्हेरी येथे उपविभागीय स्तरावरील खरीप हंगाम पूर्व नियोजन अधिकारी कर्मचारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली, यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते
श्री डुडी म्हणाले, जिल्ह्यातील कृषीच्या सर्वांगीण विकासाकरिता दिशा कृषी उन्नतीची २०२९ पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे, या आराखड्यामध्ये कृषी निर्यात वाढ, प्रक्रिया उद्योग निर्मिती, ड्रोन व एआयसारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर आदी बाबींवर भर देण्यात आला आहे. तसेच समूह संकल्पनेनुसार केळी अंजीर व डाळिंब तसेच गळीतधान्यअंतर्गत सूर्यफूल व करडई लागवड करण्यासाठी लक्षांक निश्चित करण्यात आले आहे. याकरीता शेतकरी उत्पादक कंपनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींच्यामदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत घ्यावी, असेही श्री. डुडी म्हणाले.
श्री.काचोळे यांनी विविध योजनांचा आढावा घेण्यासोबत शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी कशा प्रकारे होईल,याबात प्रयत्नशील राहावे, असेही ते म्हणाले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. प्रशांत गावडे यांनी खरीप हंगाम पिके लागवड तंत्रज्ञान, मधुमक्षिका पालन, ऊस क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापराबाबत मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी महाकृषी ॲपबाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यामधील तांत्रिक बाबी निराकरणाच्याबाबत सूचना दिल्या. कृषि पर्यवेक्षक प्रविण माने यांनी बिज प्रक्रिया व घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी तसेच कृषि सहाय्यक अंगद शिंदे यांनी ऊस बेणे प्रक्रिया व सुपर केन नर्सरी संकल्पना कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.