ऑनलाइन कामाचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी केली फसवणूक
marathinews24.com
पुणे– घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची साडे नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केरळ सहलीच्या आमिषाने पर्यटकांची फसवणूक – सविस्तर बातमी
याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमंकावर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी (ऑनलाइन टास्क), असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले होते. नामवंत हाॅटेलची जाहिरात समाज माध्यमात प्रसारित करुन त्याला दर्शक पसंती मिळवून दिल्यास दररोज १५०० ते सहा हजार रुपये मिळवा, असे आमिष दाखवून चोरट्यंनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला महिलेला एक काम दिले. महिलेने हे काम पूर्ण केल्यानंतर तिच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये जमा केले.
चोरट्यांनी पैसे जमा केल्यानंतर महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यात महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी साडेनऊ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यंनी परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत.