१४ मे ला सासवडमध्ये आयोजन
marathinews24.com
पुणे – हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती प्रथमच राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे. या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील आचार्य अत्रे सभागृह सासवड येथे १४ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लेखणी आणि समशेर यांचा अनोखा संगम असणारे छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचा स्त्रोत आहेत. पुरंदर किल्ला हे त्यांचे जन्मठिकाण असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल पथक, मर्दानी खेळ, वासुदेव, गोंधळी असे शंभरहून अधिक लोककलाकार आपली कला सादर करणार आहेत. प्रामुख्याने स्नेहलता तावडे, तेजा देवकर, ऋतुराज फडके हे कलाकार यात सहभाग घेणार असून निवेदक प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर तर राकेश अशोक शिर्के हे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत. सर्व शिवभक्त व शंभू भक्तांनी ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.




















