चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून साडेपंधरा लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. पुणे-सातारा रस्ता, कोथरूड, हडपसर भागात या घटना घडल्या. पुणे-सातारा रस्त्यावरील चंद्राई सोसायटीतील बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, अमेरिकन डाॅलर, अन्य साहित्य असा ११ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लष्कर भागात महिलेची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे राहायला आहेत. त्यांची सासू चंद्राई सोसायटीतील बंगल्यात राहायला आहेत. चोरट्यांनी १५ ऑक्टोबर रोजी बंगल्यातील दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश केला. कपाटातील दागिने, अमेरिकन डाॅलर असा ऐवज लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक शेळके तपास करत आहेत.
कोथरूडमधील सुतारदरा भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक वटपलवाड तपास करत आहेत.
हडपसर भागातील विठ्ठलनगर परिसरात एका घराचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख १५ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे तपास करत आहेत.






















