दिवाळीत कष्ट करून कमावलेले पैसेही जळाले; महिलांचा आक्रोश
marathinews24.com
पुणे – Pune Timber Market Fire : रात्रीची वेळ… दिवसभराच्या कामाचा थकवा असल्याने घरातील सगळेच गाढ झोपले होते. अचानक एकजण धावत आले अन् त्यांनी ‘आग लागली आहे, उठा… लवकर बाहेर पडा,’ असे म्हणत आरडा ओरडा केला. क्षणाचाही विलंब न करता लेकरांना उचलले आणि घराबाहेर धाव घेत सहा कुटूंबांनी जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले; पण मागे राहिलेला संसार, घरातील साहित्य आणि लेकरांच्या आठवणी आगीत जळून खाक झाल्या. आता आमच्याकडे काहीच उरले नाही… संसाराचा अक्षरशः चुरा झाला, अशा शब्दांत टिंबर मार्केटमधील आगीच्या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या महिलेने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात आग – ५० ते ६० दुकानांना आग, वसाहतीतील घरांना झळ – सविस्तर बातमी
टिंबर मार्केटमधील भीषण आगीने अनेक कुटुंबांचे आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त केले. आगीच्या ज्वाळांनी ५० ते ५५ दुकाने कवेत घेतली. दुकानांमधील साहित्य, वस्तू आणि कष्टाने उभा केलेला व्यवसाय क्षणार्धात राख झाला. मात्र, या आगीची झळ केवळ दुकानदारांनाच बसली नाही, तर परिसरातील कुटुंबांचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीत ६ घरांची राखरांगोळी झाली असून, वाहन देखील जळाले आहे. सहा घरांपैकी चार घरातील संसारोपयोगी वस्तूंपासून मुलांच्या शैक्षणिक साहित्यापर्यंत सर्व काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दुर्घटनेत चिमुकल्यांचे दप्तर, पुस्तके, वह्या, बूट आणि सॉक्सदेखील जळून गेले. रोज शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची राख झाल्याचे पाहून लहान मुलांनाही अश्रू अनावर झाले. मुलांचे शैक्षणिक साहित्य तरी वाचले असेल, अशी आशा होती; मात्र आगीने त्यावरही पाणी फेरले. घरातील मोठ्यांना जीव वाचविण्याची चिंता, तर चिमुकल्यांना आपले दप्तर, पुस्तके आणि आवडत्या वस्तू गमावल्याचे दुःख, असे विदारक चित्र परिसरात पाहायला मिळाले.
दिवाळीत कष्ट केले, ते पैसेही जळाले
दिवाळीच्या काळात काम करून कष्टाने कमावलेले पैसे घरात ठेवले होते. सणासुदीच्या काळात केलेल्या मेहनतीचे पैसे पुढील गरजांसाठी उपयोगी पडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आगीने त्या पैशांनाही सोडले नाही. घरातील सामानासोबत पैसे जळून गेले. वर्षभर कष्ट करून जमवलेली पुंजी डोळ्यांदेखत संपली. आता पुन्हा संसार उभा कसा करायचा, लेकरांच्या गरजा कशा भागवायच्या, असा प्रश्न या कुटुंबांसमोर उभा राहिला आहे. आगीच्या घटनेनंतर परिसरात सर्वत्र जळालेल्या वस्तूंचा खच, राखेचे ढीग आणि उद्ध्वस्त झालेल्या दुकानांचे अवशेष दिसत होते. काही जण आपल्या दुकानातून काय वाचले आहे, याचा शोध घेत होते, तर काही जण घरातील उरलेसुरले साहित्य शोधण्याचा प्रयत्न करीत होते.
अनेकांच्या डोळ्यांत अश्रू
आयुष्यभराची कमाई आणि संसाराची पुंजी एका आगीत संपल्याने नागरिक हतबल झाले होते. आगीच्या ज्वाळा विझल्या, धुराचे लोटही कमी झाले; मात्र या दुर्घटनेने बाधित कुटुंबांच्या आयुष्यात निर्माण झालेला अंधार कायम आहे. जीव वाचला, हीच समाधानाची बाब असली, तरी उद्याचा दिवस कसा काढायचा, पुन्हा संसार कसा उभा करायचा व लेकरांच्या भविष्याचे काय, असे असंख्य प्रश्न या कुटुंबांना सतावत आहेत. राखेच्या ढिगाऱ्यात उरलेल्या वस्तू शोधताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी अगतिकता या आगीची भीषणता शब्दांपेक्षाही अधिक बोलकी ठरत होती.
चार कुटूंब स्थलातंरीत
आगीत सहा घरांची राख रांगोळी झाली असून, प्रशासनाने यातील चार कुटूंबांना लष्कर भागातील निवारा केंद्रात स्थलांतरीत केले असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे.






















