रोकडसह ऐवजांची चोरी
marathinews24.com
पुणे – Pune House Robbery : शहरातील विविध भागात घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, दिवाळीला गावी गेलेल्या नागरिकांच्या घरातून ऐवज चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली असून, घरफोडी करणार्यांचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे. अशाच दोन घरफोडीच्या घटना कात्रज आणि लोहगावमध्ये घडल्या आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस असल्याची बतावणी; ज्येष्ठाकडील ५ लाखांचे दागिने चोरले – सविस्तर बातमी
बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. ही घटना ४ ते १७ नोव्हेंबर कालावधीत कात्रजमधील शेलारमळा परिसरातील साई गजानन अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार हे दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. ४ ते १७ नोव्हेंबर कालाधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ५२ हजारांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत आहेत.
राहत्या घराची कडी उचकटून चोरट्यांनी ५१ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना १६ ते १७ नोव्हेंबरला लोहगावमधील माथे आळीत घडली आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार महिलेचे घर कुलूपबंद असताना चोरट्यांनी कडी उचकटून आतमध्ये प्रवेश केला. घरातील बॅगेतून पाच हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ५१ हजारांचा ऐवज चोरुन नेला. गावाहून आल्यानंतर तक्रारदार महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार गायकवाड तपास करत आहेत.





















