२५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
marathinews24.com
पुणे – गोदाम फोडून २५ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून पसार झालेल्या टोळीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून ६ लाख ४० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा, गुन्ह्यातील टेम्पो असा २४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजेंद्र मोतीचंद जैन (वय ५२, रा. माणकेश्वर बिल्डींग, मुंबई), विनोद श्रीपाल जैन (वय ४०, रा. कामाठीपूरा, मुंबई), सोहेल फिरोज शेख (वय २२, रा. रे रोड, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आयपीओची गुंतवणूक पडली महागात, तब्बल ३८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
वाघोली-लोहगाव रस्त्यावरील जैन वेअर हाऊस, रिमश्री कॉपर इंडिया प्रा. लि. या गोदाम आहे. गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना २८ फेब्रुवारीला घडली होती. तांब्याच्या तारा चोरुन आरोपी टेम्पोतून पसार झाले होते. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाघोली पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून आरोपींचा माग काढण्यात आला. पोलिसांनी जवळपास १७२ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तांत्रिक तपास, तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
आरोपी जैन आणि शेख यांच्याकडून ६ लाख ४० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि १८ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, प्रदीप मोटे, प्रशांत कर्णवर, दीपक कोकरे, विशाल गायकवाड, महादेव कुंभार, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, प्रीतम वाघ, समीर भोरडे, मंगेश जाधव, अमोल गायकवाड यांनी ही कामगिरी केली.