सुरक्षारक्षकाच्या खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड
marathinews24.com
पुणे – Hadapsar Crime News Pune : शहरातील हडपसरमधील काळेपडळ परिसरात गुन्हेगारी टोळक्याने एकाच रात्री अक्षरशः हैदोस घातला. महापालिकेच्या चिंतामणी भाजी मंडईत कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकावर लोखंडी हत्याराने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर काळेपडळमधील स्टार बेकरीसमोर एका टोळक्याने वाहनांची तोडफोड करीत शस्त्रे व लोखंडी रॉड हवेत फिरवून दहशत माजवली. याचदरम्यान संकेत विहार परिसरातही चार वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. एकाच रात्री घडलेल्या या घटनांमुळे हडपसर परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात दोन, तर फुरसुंगी पोलिस ठाण्यात एक असे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारे सराईत तडीपार – सविस्तर बातमी
चिंतामणी भाजी मंडईत १४ नोव्हेंबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास हा हल्ला झाला. आकाश लक्ष्मण कोटावळे (वय २७) हा महापालिकेच्या मंडईत सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्य बजावत होता. अज्जू उर्फ मोहम्मद हुसेन शब्बीर शेख, अविनाश केकाण आणि त्यांच्या साथीदाराने त्याला बोलावून घेतले. तू वारंवार अडवतोस, या कारणावरून वाद घालत लोखंडी हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. यात आकाश गंभीर जखमी झाला. (Hadapsar Crime News Pune) या प्रकरणी त्याचे वडील लक्ष्मण कोटावळे यांनी फिर्याद दिली. या गुन्ह्यात अज्जू आणि अविनाश केकाण या दोघांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे.
काळेपडळमधील स्टार बेकरीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर दुसरा प्रकार घडला. आशिष विलास पाटील (वय ३९) यांच्या फिर्यादीनुसार, अज्जूभाई शेख, अविनाश केकाण, सिद्धार्थ आणि त्यांच्या साथीदारांनी वाहनांची तोडफोड केली. शस्त्रे आणि लोखंडी रॉड हवेत फिरवत धमक्या दिल्या. शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. तिसरी घटना संकेत विहार परिसरात घडली. करण नागटीळक, अविनाश केकाण आणि त्यांच्या एका साथीदाराने लोखंडी धारदार हत्यारे व दगडांनी चार वाहनांचे नुकसान केले. पिकअप, ट्रॅव्हल्स आणि दोन मोटारींच्या काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी अभिजीत टेके यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एकाच रात्री तीन गुन्हे, दोन पोलिस ठाण्यांत नोंद
अज्जू शेख आणि अविनाश केकाण याचे नाव सुरक्षारक्षकावरील हल्ला आणि वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये समोर आले आहे. काळेपडळ पोलिस ठाण्यात सुरक्षारक्षकाच्या खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड, असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तर संकेत विहारमधील वाहनांच्या तोडफोडीचा स्वतंत्र गुन्हा फुरसुंगी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. एकाच परिसरात सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरणे निर्माण झाले आहे.






















