६० हजारांची रोकड लंपास, आरोपीला अटक
marathinews24.com
पुणे – Pune Crime : शहराचे ग्रामदैवत असलेल्या मध्यवर्ती कसबा पेठेतील गणपती मंदिरातील दानपेटीतील रोकडवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना मंगळवारी (दि.६) मध्यरात्री घडली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या बढाया मारणार्या परिमंडळ एकच्या हद्दीसह फरासखाना पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेषतः रात्रपाळीला असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी, बीट मार्शल, गुन्हे शाखेच्या पथकांच्या कामालाही चोरीमुळे बट्टा लागला आहे. दरम्यान, चोरीचा प्रचंड गाजावाजा झाल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. संग्राम राजेंद्र जाधव (वय २९ रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला – सविस्तर बातमी
मध्यवर्ती कसबा पेठेत गणपतीचे प्राचीन मंदीर असून, ते पुण्याचे ग्रामदैवत आहे. आजूबाजूला प्रचंड रहदारी आणि वर्दळीचा परिसर असून, लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. मंगळवारी पूजाअर्चा झाल्यानंतर रात्राच्या सुमारास गणपतीचे मंदीर बंद करण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरटा संग्राम जाधव हा त्याठिकाणी पोहोचला. त्याने मंदिराच्या दरवाजावर असलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने थेट दानपेटीचे कुलूप तोडून डल्ला मारला. Pune Crime त्यातील ६० हजारांची रोकड घेउन तो पसार झाला. दरम्यान, पहाटेच्या सुमारास पूजाअर्चा करण्यासाठी पुजारी मंदीरात गेले होते. त्यावेळी त्यांना मंदिरातील दानपेटी फोडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने विश्वस्तासह पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार फरासखाना पोलिसांसह पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
देवही आता असुरक्षित
पोलिस अधिकार्यांनी कसबा गणपती मंदीराचा दरवाज्याची पाहणी केली. त्यावेळी चोरट्याने कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांच्या पथकाने आरोपी संग्राम जाधव याचा शोध घेउन त्याला ताब्यात घेतले. त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, मध्यवर्ती कसबा गणपती मंदिरात चोरी झाल्यामुळे नागरिकांसह भाविकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. एकीकडे नागरिकांचे फ्लॅट फोडले असतानाही, आता देवही सुरक्षित राहिले जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.























