जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने आयोजन; १६ दिवसांत करणार ३५० किलोमीटरचा प्रवास
marathinews24.com
पुणे – Vasundhara Pady Dindi : जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धनाचा महामंत्र आणि अध्यात्माचा पवित्र संदेश घेऊन ‘वसुंधरा पायी दिंडी’ने श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने प्रस्थान ठेवले. अतिशय भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात सिद्ध पादुकांच्या पावन सान्निध्यात हजारो धामयात्री पर्यावरण जागृतीच्या या मोहिमेत सहभागी झाले. मुख्य पीठ नाणीजधाम पश्चिम महाराष्ट्र पुणेच्या वतीने या पायी दिंडीचे आयोजन केले आहे. पीठाचे प्रमुख संजय गाडेकर, वसुंधरा पायी दिंडी प्रशासनाचे अध्यक्ष व प्रवक्ता प्रवीण ठाकूर, सहपीठप्रमुख कमलाकर हजारे यांनी विधिवत पादुकांचे पूजन केल्यानंतर ही पालखी व दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी दिंडीप्रमुख विजय आंग्रे व व्यवस्थापक विनायक नाईक उपस्थित होते.
आशियाई पदक विजेती प्रिथिका प्रदीपचा सत्कार – सविस्तर बातमी
प्रवीण ठाकूर म्हणाले, “महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, पुणे, परभणी, मुंबई येथून पाच, तर तेलंगणा व गोव्यातून दोन अशा एकूण सात ठिकाणहून या दिंडी निघाल्या आहेत. पुण्यातून निघालेल्या या दिंडीमध्ये जवळपास ६५० भक्तगण सहभागी झाले आहेत. पुणे ते नाणीजधाम असा ३५० किलोमीटरचा प्रवास ते १६ दिवसांत करणार आहेत. यादरम्यान दिवसभरात चार ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे. या सर्व दिंड्या २१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे एकत्र येणार आहेत. Vasundhara Pady Dindi २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव असून, या नाणीजधाम येथील आश्रमात भजन, किर्तन, महाप्रसाद अशा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.”
संजय गाडेकर म्हणाले, ‘वसुंधरा पायी दिंडी’चे हे चौथे वर्ष आहे. ही दिंडी सामान्य दिंडीप्रमाणे नाही. या दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येतो. जागतिक तापमानवाढ रोखण्यासह झाडे लावण्याचा संदेश देणारे पोशाख, हातात फलक घेऊन सिद्ध पादुकांच्या सान्निध्यात ही वसुंधरा दिंडी निघाली आहे. गेल्या काही वर्षात तापमान वाढ, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, नदी-नाल्यांची स्वच्छता यांसारख्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत जनजागृती करणे हा या दिंडीचा मुख्य उद्देश आहे. वारीत सहभागी भक्तगण दररोज साधारण २५ किलोमीटरचा टप्पा चालतील.”
वारकऱ्यांची जेवणाची-पाण्याची, राहण्याची, वैद्यकीय व्यवस्था चोख करण्यात आली आहे. आज कर्वेनगरमध्ये वारीचा पहिला मुक्काम असेल. ही दिंडी राजाराम पूल, सिंहगड रस्ता, स्वारगेट, हडपसरमार्गे सासवड येथून पुढे मार्गस्थ होईल, असे कमलाकर हजारे यांनी सांगितले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने रत्नागिरी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा, वेदपाठशाळा पूर्णपणे मोफत चालवली जाते. तसेच रक्तदान शिबिरे, रुग्णवाहिका सुविधा यांसारख्या आरोग्याच्या विविध सुविधा दिल्या जातात. याशिवायही राज्यभरात समाजपयोगी विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात, असेही त्यांनी नमूद केले.























