१३३ वर्षांचा गणेशोत्सव लोकसहभागातून टिकवा- रविंद्र माळवदकर यांची मागणी
marathinews24.com
पुणे – Pune Ganesh Festival Planning : तब्बल १३३ वर्षांच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा आणि लोकसहभाग टिकविण्यासाठी विसर्जनानंतरच्या पहिल्या चतुर्थीपासूनच पुढील वर्षाच्या उत्सवाचे नियोजन सुरू करावे, अशी मागणी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र दिले आहे. त्यांनी अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा सादर – सविस्तर बातमी
गणेशोत्सवाच्या महिनाभर आधी बैठका घेऊन प्रश्न सुटत नाहीत. दरवर्षी नवीन समस्या निर्माण होत आहेत, असा गेल्या २० वर्षांतील अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे दरवर्षी गणेश विसर्जनानंतर येणाऱ्या पहिल्या चतुर्थीपासून पुढील ११ महिने उत्सवाच्या नियोजनावर काम करावे. (Pune Ganesh Festival Planning) सुरुवातीला अनुभवी गणेश मंडळांचे कार्यकर्ते, आजी-माजी पत्रकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संवाद बैठक घ्यावी. त्यानंतर सर्व घटकांना सहभागी करून व्यापक चर्चा करावी, अशी सूचना माळवदकर यांनी केली आहे.
गणेशोत्सवाने सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा लोकउत्सव प्रशासनाच्या नियंत्रणाखाली जात आहे. शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागांत गणेशोत्सवाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार किमान दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना बैठकांमध्ये सहभागी करून घ्यावे उपक्रमासाठी शेकडो गणेशोत्सव कार्यकर्ते आणि नागरिक प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार असल्याचेही माळवदकर यांनी स्पष्ट केले आहे.
























