कोंढवा, गाडीतळ हडपसर, फुरसुंगी परिसरात घडल्या घटना
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात चोरट्यांनी धुडगूस घातला असून, बंद घराचे कुलूप तोडून ऐवज चोरीच्या घटना साततत्याने घडत आहेत. दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या नागरिकांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेला जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यापासून बहुतांश भागात चोरट्यांनी अक्षरशः लुटीचा हैदोस घातला आहे. अशाच घटना कोंढवा, गाडीतळ हडपसर, फुरसुंगी परिसरात घडल्या आहेत.
पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात आग – सविस्तर बातमी
घराचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करीत २ लाख ४ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना १४ ते १७ नोव्हेंबर कालावधीत कोंढवा बुद्रूकमधील काझीनगरात घडली आहे. याप्रकरणी तरुणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विटे तपास करत आहेत. दुसर्या घटनेत चोरट्यांनी गाडीतळ हडपसर परिसरातील साईनाथ वसाहतीतील घराचे कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना १६ ते १७ नोव्हेंबर कालावधीत घडली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक साने तपास करत आहेत.
राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १२ ते १५ नोव्हेंबर कालावधीत फुरसुंगीतील मुक्ताई रेसीडन्सीमध्ये घडली आहे. तक्रारदार हे बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील १५ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून २ लाख १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. तक्रारदार हे गावाहून आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करत आहेत.
खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये चोरी
खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये शिरलेल्या महिलेने ४० हजार रूपये किंमतीची हिरेजडीत सोन्याची अंगठी चोरुन नेली आहे. ही घटना १३ नोव्हेंबरला रात्री सव्वा दहाच्या सुमारास लक्ष्मी रोडवरील आशापुरी ज्वेलर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गुलटेकडी परिसरात राहायला असून, लक्ष्मी रोडवरील शगुण चौकात त्यांचे ज्वेलर्स आहे. १३ नोव्हेंबरला ते दुकानात असताना एक महिला खरेदीच्या निमित्ताने ज्वेलर्समध्ये आली. तिने मालकासह कामगारांची नजर चुकवून ४० हजारांची हिरेजडीत सोन्याची अंगठी चोरुन नेली. दुसर्या दिवशी ज्वेलर्समधील दागिन्यांच्या हिशेबात अंगठी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर याप्रकरणी संबंधिताने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार शेडजाळे तपास करत आहेत.






















