मॅरेथॉन स्पर्धेतील सुवर्ण विजयाने उपस्थितांचे डोळे पाणावले
maratinews24.com
बीड (अनंत जाधव) – यश संपादन करायचे म्हटले तर मनात जिद्द आणि स्वतः वर आत्मविश्वास असलाकी त्याला वयाची अट लागत नाही. अंबाजोगाई येथील आयोजित मॉरेथॅन स्पर्धेत पाहायला मिळाले आहे. ना पायात महागडे स्पोर्टस शूज, ना ट्रॅकसूट, ना कसला प्रशिक्षक…मनात होती ती फक्त जिंकण्याची जिद्द. दोन मुलींच्या भविष्याची चिंता याच जिद्दीच्या जोरावर अंबाजोगाईत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत स्वयंपाकाचे काम करणाऱ्या रमाबाई रणवीर (वय ४७) यांनी चक्क साडी नेसून, स्लीपर हातात धरून अनवाणी धावत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तरुणींना मागे टाकत त्यांनी मिळवलेल्या या सुवर्ण विजयाने उपस्थितांचे डोळे पाणावले, तर संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलेला पाहायला मिळाला.
‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर – सविस्तर बातमी
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौक दरम्यान ‘अमृत दौड’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच गर्दीत सर्वात मागच्या रांगेत रोजच्या सारख्या साध्या साडीत रमाबाई उभ्या होत्या. लोकांना वाटले त्या केवळ गंमत म्हणून आल्या असाव्यात. मात्र ध्वज फडकला, शिट्टी वाजली आणि त्या धावू लागल्या. सुरुवातीला तरुण-तरुणी वेगाने पुढे निघून गेले. काही अंतर पार केल्यानंतर पायातील स्लीपर निसटू लागल्याने रमाबाईंनी ती हातात घेतली आणि अनवाणी पायाने धावायला सुरुवात केली.
पावसाने गार पडलेला रस्ता आणि पायाला टोचणारे खड़े अशा प्रतिकूल परिस्थितीत साडीचा पदर सांभाळत त्या धावत होत्या. एक-एक करत ट्रॅकसूट घातलेल्या स्पर्धकांना मागे टाकले आणि फिनिशिंग लाइनवर प्रथम धडक मारली. आयोजकांनी जेव्हा त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले, तेव्हा म्हणाल्या मुलीच्या शिक्षणासाठी काही कमी पडू नये आणि त्याच्या शिक्षणात भर पडावी यासाठी रोज मी धावपळ करते.





















