शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Shivajinagar House Robbery Pune : शिवाजीनगर गावठाण परिसरातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड, दागिने असा २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. माॅडेल काॅलनी भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी दागिने, जुनी घड्याळ, मोबाइल असा ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात काळेपडळ, चिंतामणीनगरमध्ये टोळक्याचा राडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय हे शिवाजीनगर गावठाण परिसरातील मिसाळ चेंबर्स सोसायटीत राहायला आहेत. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास चोरट्यांनी सदनिकेच्या पाठीमागील दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरटे शयनगृहात शिरले. शयनगृहातील कपाटातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरुन चोरटे पसार झाले.
शिवाजीनगर भागातील माॅडेल काॅलनी परिसरात बंगल्यातील पाठीमागील दरवाज्याची कडी तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, जुने घड्याळ, मोबाइल असा ५६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. (Shivajinagar House Robbery Pune) याबाबत एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे माॅडेल काॅलनीतील टपाल कार्यालय परिसरातील बंगल्यात राहायला आहेत. सहायक पोलीस निरीक्षक घाटे तपास करत आहेत.






















