सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – प्रवाशाला गाडीत बसवून बेदम मारहाण करीत लुटमार करणार्या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३० मे रोजी नवलेब्रीज परिसरात घडली होती. आरोपींकडून मोबाइल, मोटार असा ४ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. निखील अरविंद पवार (वय २७ रा. मातोश्री अपार्टमेंट, वेताळनगर, आंबेगाव बुद्रूक) आणि रोहन शाम पवार (वय २७ रा. नर्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ट्रकवर टेम्पो आदळून चालक ठार, क्लिनर जखमी – सविस्तर बातमी
तक्रारदार हे कोल्हापूरला जाण्यासाठी ३० मे रोजी रात्री बाराच्या सुमारास नवले ब्रीज परिसरात थांबले होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांना कोल्हापूरला सोडतो, ४०० रूपये लागतीत असे भाडे ठरवून गाडीत बसविले. काही अंतरावर गेल्यानंतर टोळक्याने तक्रारदाराला बेदम मारहाण करीत मोबाईल, कानातील सोन्याची बाळी, रोख रक्कम, चांदीची अंगठी मारहाण करुन बळजबरीने काढुन घेतली.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी तपास पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले. पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे व निलेश भोरडे यांना गुन्हयातील आरोपी भुमकर चौक नन्हेत थांबल्याची माहिती मिळाली.
पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांनी वरिष्ठांना माहिती देउन घटनास्थळी धाव घेतली. आरोपी निखील पवार याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार निखील पवार, शुभम डोक, रोहन पवार, शाहरुख शेख यांच्यामदतीने तक्रारदाराला मारहाण करून लुटल्याची कबुली दिली. आरोपी रोहन पवार नर्हेत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. आरोपींकडून ३० हजारांचा मोबाइल, ४ लाखांची मोटार असा ऐवज जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार, अपर आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, निलेश भोरडे, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतिष मोरे, संदिप कांबळे, तानाजी सागर, समीर माळवदकर, शिरीष गावडे यांनी केली.