दागिने, रोकड आणि कागदपत्रे लंपास
marathinews24.com
पुणे – वाकडेवाडी एसटी स्थानकात अकोल्याला जाण्यासाठी गाडीत बसलेल्या महिलेच्या सुटकेसमधून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, १ लाख ५७ हजार रुपयांची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. बस बदलण्याच्या गडबडीत गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हा ऐवज लंपास केला. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेची ५० लाखांची फसवणूक; व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
Wakdewadi Bus Stand Theft – कमल दत्ता आठवे (वय ६२, रा. इंदेवाडी, पाण्याच्या टाकीजवळ, जि. जालना) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवे या पतीसह अकोल्याला जाण्यासाठी वाकडेवाडी बसस्थानकात आल्या होत्या. त्या दोघांनी अकोल्याला जाणाऱ्या बसमध्ये सामानासह प्रवेश केला. बसमध्ये बसल्यानंतर अवघ्या १० ते १२ मिनिटांत वाहतूक निरीक्षकांनी प्रवाशांना ही बस सध्या जाणार नसल्याचे सांगितले. तसेच सर्व प्रवाशांना बाजूच्या बसमध्ये बसण्यास सांगितले. त्यामुळे आठवे या पतीसह बसमधून खाली उतरत होत्या. त्यावेळी त्यांनी सुटकेस तपासली असता, त्यातील सोन्याचे दागिने, एक लाख ५७ हजार रुपयांची रोकड आणि कागदपत्रे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सुटकेसच्या दोन्ही बाजूंची बटणे उघडी असल्याचेही दिसून आले. बसमध्ये चढताना किंवा खाली उतरताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सुटकेसमधील ऐवज चोरल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर आठवे यांनी खडकी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.






















