धुळ्यातील शिरपूर येथून आलेल्या तरुणाकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने १० किलो १३८ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. हरिश मगन सोनवणे (वय २७, रा. काळभैरवनगर, पिंपरी गाव, मुळ रा. शिरपूर, जि. धुळे) असे या तरुणाचे नाव आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीला आळा घालण्याकरीता पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक २० मार्च रोजी पिंपळे सौदागर भागात पेट्रोलिंग करीत होते. प्रथम रेस्ट्रो बारचे समोर रस्त्याच्या कडेला पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांना एक जण टि व्ही एस ज्युपिटर या दुचाकीवर पाठीवर सॅक व गाडीचे पुढील बाजूस ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन कोणाची तरी वाट पहात थांबलेला दिसला. त्याच्याविषयी संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याला थांबण्याबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे वागणे संशयास्पद दिसल्याने त्यांच्या सॅकची व ट्रॅव्हलिंग बॅगची झडती घेतली असता त्याच्याकडे १० किलो १३८ ग्रॅम गांजा मिळून आला. गांजा, मोबाईल, दुचाकी असा ५ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्पे, विजय दौंडकर यांनी केली आहे.