मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात, १४ जण जखमी
marathinews24.com
पुणे – ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत मोटारीतील तिघांचा मृत्यू झाला असून, विविध वाहनांतील तब्बल १४ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा परिसरात रविवारी रात्री भरधाव ट्रकने मोटारीला धडक दिल्यामुळे अपघात झाला. अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला असून, ते पुण्यातील आहेत.
प्रिया सागर इंगुळकर (वय ३५, रा. टिळक रस्ता, १०४१, शुक्रवार पेठ), निलेश संजय लगड (वय ४२), श्राव्या निलेश लगड (वय १२, दोघे रा. गिरिजाशंकर अपार्टमेंट, सदाशिव पेठ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सागर पांडुरंग इंगुळकर (वय ४०) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लघुशंकर करण्यासाठी थांबलेल्या तरुणाला लुटले – सविस्तर बातमी
अपघातात जखमींची नावे
शरयू लगड, रुद्राक्ष लगड, अंशिका मोगल, आरव मोगल, अर्श लगड, अर्षित लगड, तसेच मुंबईकडे निघालेल्या मोटारीतील अश्विनी रमेश जाडकर (वय ४३), ओमकेश रमेश जाडकर (वय २३), सुमीत तुकाराम कदम (वय २४), पुष्कर लक्ष्मण शेळकंदे (वय २५), जिग्नेश रमेश जाडकर (वय १२), संजय नामदेव वाल्हेकर (वय ४२), विमल नामदेव वाल्हेकर (वय ६९, सर्व रा. भिवंडी, जि. ठाणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगड आणि इंगुळकर हे नातेवाईक असून, ते कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त परगावी गेले होते. रविवारी रात्री जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन ते मोटारीतून पुण्याकडे परतत होते. त्यावेळी मुंबईकडे भरधाव वेगात ट्रक निघाला होता. मुंबईकडे जाणार्या मोटारीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्यावेळी मोटारचालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार पुण्याकडे येणार्या मोटारीवर आदळली. अपघातात सागर इंगुळकर यांची पत्नी प्रिया, साडू निलेश लगड आणि त्यांची मुलगी श्राव्या गंभीर जखमी झाले. मुंबईकडे निघालेल्या मोटारीतील चालकासह सात जण जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड तपास करत आहेत.