बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण
marathinews24.com
पुणे – मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यायीन तरुणीवर बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार करून पसार असलेल्या तिसऱ्या आरोपीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. वालचंदनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले आहे. सूरज उर्फ बापू गोसावी (रा. सणसर,भवानीनगर ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) आणि अख्तर अली शेख ( वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना अटक केली होती.
पुणे : खुणाच्या प्रयत्नात तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी
मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची घटना ३ ऑक्टोबर २०२४ मध्ये बोपदेव घाट परिसरात घडली होती. या प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रभर संतप्त लाट उसळली होती. त्याननंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपीच्या शोधार्थ मोहीम राबवत दोघांना अटक केली होती. मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी पसार झाला होता. तो मोबाईल वापरत नसल्यामुळे आणि खबऱ्याकडील माहिती अपुरी असल्याने त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते.
आरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी बोपदेव घाटाच्या परिसरातील ४५ गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराईतांची चौकशी केली होती. आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेकडून ६० पथके विविध ठिकाणी शोध घेत होती. त्यानंतर।१० ऑक्टोबरला येवलेवाडी परिसरातून आरोपी कनोजियाला अटक केली होती. चौकशीत दुसरा आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ मूळगावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शेखला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली होती.
याप्रकरणातील आरोपी सूरज गोसावी हा फरार होता. शनिवारी (दि. २६) गोसावी हा अकलूज, ता. माळशिरस येथील जुन्या बस स्टँडवरून पळून जाण्याच्या तयारीत असून, तो कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर वालचंदनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपीबाबत माहिती दिली. शनिवारी रात्री उशीरा पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास पुणे गुन्हे शाखा करत आहेत.