विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शेअर मार्केटमध्ये ट्रेडींगचे आमिष तरूणाच्या अंगलट आले असून, सायबर चोरट्यांनी त्यांची १० लाख ८ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना १ ते ७ डिसेंबर २०२५ कालावधीत विमाननगरात घडली आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर परिसरात घरफोडी; कुलूप तोडून दागिने लांबविले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विमाननगरमधील क्लोअर पार्कमध्ये राहायला असून, १ ते ७ डिसेंबर २०२५ कालावधीत सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानुसार संबंधिताने बँकखात्यात रक्कम वर्ग करण्यास सुरूवात केली. अवघ्या ७ दिवसांत १० लाख ८ हजार रूपये ऑनलाईनरित्या स्वीकारून सायबर चोरट्यांनी तरूणाला गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक महेश बोलके तपास करीत आहेत.
बाणेर-बालेवाडीतील एकाला ७ लाखांचा गंडा
व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतल्यानंतर सायबर चोरट्यांनी एकाला शेअरमधील गुंतवणूकीच्या बहाण्याने ऑनलाईनरित्या ७ लाख २२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना ११ जुलै ते २९ ऑक्टोबर २०२५ कालावधीत बाणेर-बालेवाडीत घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करीत आहेत.
























