गांजा विक्री करणाऱ्या महिलेसह कोयते बाळगणारे दोघे ताब्यात
marathinews24.com
पुणे – Pune Crime News : शहरात गुन्हे शाखेने दुहेरी कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हेगारांना पकडले आहे. पहिल्या कारवाईत वयाच्या ५५ व्या वर्षीही गुन्हेगारीत सक्रिय राहून गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. तर, दुसऱ्या कारवाईत कोयते घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीनासह दोघांना पकडले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने वारजे, धायरी परिसरात कारवाई केली आहे.
फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी
वारजे परिसरात छापा टाकून सुनीता सिकंदर भाट (वय ५५, रा. अमर भारत सोसायटी, वारजे) हिला अटक केली. तिच्याकडून ५९२ ग्रॅम गांजा आणि विक्रीतून मिळालेले १ हजार ३०० रुपये, असा एकूण ३० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे पथक सिंहगड रस्ता, नऱ्हे, नांदेड सिटी, वारजे आणि उत्तमनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तसेच गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रतिबंधात्मक गस्त घालत होते.
वारजे येथील अभिनव भारत सोसायटीजवळ महिला गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पोलिस अंमलदार तुषार किंद्रे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी छापा कारवाई करत तिला ताब्यात घेतले. झडती घेतली असता ५९२ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत २९ हजार ६०० रुपये असून, गांजा विक्रीतून मिळालेले १३०० रुपयेही पोलिसांनी जप्त केले. Pune Crime News याप्रकरणी सुनीता भाट हिच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी तिला वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिच्यावर यापूर्वीही अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल आहे.
Pune Crime News धायरीत दोन तरुणांना लोखंडी धारदार कोयते बाळगताना पकडण्यात आले आहे. यात एक अल्पवयीन असून, त्याला ताब्यात घेतले आहे. बेंकर वस्ती परिसरात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दोन लोखंडी धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत. हेमंत पुरुषोत्तम वाणी (वय १८ वर्षे १० महिने, रा. फ्लॅट क्रमांक ३०८, शिवप्रस्थ हाइट्स, आंबाईमाता मंदिर रोड, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या आरोपीसह विधिसंघर्षित बालकाला पुढील कारवाईसाठी नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत अत्रे तसेच उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पंढरीनाथ शिंदे, पोलिस अंमलदार मनोज पवार, अमित बोडरे, तुषार किंद्रे यांच्या पथकाने केली.






















