सासू-सासरे, नणंदविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – माहेरहून पैसे आणण्याच्या सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना १२ सप्टेंबरला फुरसुंगीतील पापडेवस्तीवर घडली आहे. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून, सासू-सासर्यासह नणंदविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐश्वर्या आशुतोष जाधव (वय २६ रा. ढमाळवाडी, फुरसंगी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती आशुतोष गोविंद जाधव (वय ३०) याला अटक केली आहे. अरुण देवरे (वय ५४ रा. फुरसुंगी ) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शेअर्समधील गुंतवणूक पडली महागात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या आणि आशुतोष यांचे डिसेंबर २०२५ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर ऐश्वर्या सासरी नांदत असताना पती आशुतोषसह सासू-सासरा, नणंदेने संगनमत केले. माहेरहुन पैशांची मागणी करीत ऐश्वर्याचा छळ केला. शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून ऐश्वर्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच फुरसुंगी पोलिसांनी पतीला अटक केली असून, सासू-सासर्यासह नणंदेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती माने तपास करीत आहेत.
पोलिसांकडील तक्रारीच्या रागातून पत्नीवर वार; पती अटकेत
पोलीस ठाण्यात स्वतःविरूद्ध तक्रार केल्याच्या रागातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १२ सप्टेंबरला केशनवगर मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पतीला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. साईनाथ कडुबा काळे (वय ३२ रा. वडगाव शेरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जखमी महिलेच्या भावाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बहीण आणि आरोपी साईनाथ हे पती-पत्नी आहेत. त्यांच्यात सततच्या वादामुळे महिलेने नवर्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच रागातून आरोपी साईनाथने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोक्यात, चेहर्यावर, दोन्ही हातावर वार करून पत्नीला त्याने गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणाची माहिती मिळताच आरोपीच्या मेव्हण्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर तपास करीत आहेत.
बसमध्ये शिरताना महिलेची सोन्याची बांगडी चोरीला
पीएमपीएल बसमध्ये शिरताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील १लाख २५ हजारांची सोन्याची बांगडी कापून चोरुन नेली. ही घटना १० सप्टेंबरला दुपारी सव्वा एकच्या सुमारास हडपसर गाडीतळ ते होळकरवाडी प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोरमध्ये राहणार्या ५० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोणी काळभोर मधील होळकर वाडीतील असून, कामानिमित्त १० सप्टेंबरला हडपसरला आल्या होत्या. काम संपल्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास गाडीतळ परिसरातून होळकरवाडीकडे जाणार्या बसमध्ये महिला प्रवेश करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी महिलेच्या हातातील सव्वा लाखाची बांगडी कापून चोरुन नेली. याप्रकरणी माहिती होताच महिलेने बस थांबवून पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस अमलदार सोनवणे तपास करीत आहेत.






















