एकाच दिवसात कोथरूड, अलंकार परिसरात महिलांना लुटले
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, जेष्ठ महिलांसह पादचारी महिलांना लक्ष्य करीत दागिने हिसकावून नेले जात आहेत. वारंवार दागिने हिसकावण्याच्या घटनांमुळे महिलांना घराबाहेर पडावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे मात्र, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांकडून स्ट्रीट पेट्रोलिंगकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळेच दुचाकीस्वार चोरट्यांचे फावले आहे. कोथरूड आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी महिलांचे दागिने हिसकाविल्याच्या घटना घडल्या आहेत.
मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ हजारांचे मंनी मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ११ मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास कोथरूडमधील लोहिया जैन आयटी पार्कसमोरील चांदणी चौकातून पौड फाट्याकडे जाणार्या रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी रेखा विष्णू शास्त्री (वय ६९ रा. माहाडकर रेसीडेन्सी, पौड रस्ता) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सानप तपास करीत आहेत.
फुले घेण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र पादचारी चोरट्याने हिसकावून नेले. ही घटना ११ मे रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास दशभुजा गणपती मंदीर पौड फाटा परिसरात घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मी तुकाराम समदडे (वय ४३ रा. राउतवाडी, कोथरूड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार लक्ष्मी आणि त्यांचा मुलगा फुले घेण्यासाठी दशभुजा गणपती मंदीराजवळ थांबले होते. त्यावेळी पाठीमागून चालत आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटा सुसाट पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.
पोलिसांची मॉर्निंग वॉक पथके गायब
मॉर्निंग वॉक करणार्या नागरिकांना लक्ष्य करीत ऐवज लुटमारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित विभागात मॉर्निंग वॉक पथके तैनात केली होती. पथकांनी काही दिवस काम केल्यानंतर दागिने हिसकाविण्याच्या घटनांचा आलेख कमी झाला होता. मात्र, ही पथके पुन्हा एकदा ढेपाळली असल्याची संधी साधून चोरट्यांनी दागिने हिसकाविण्याचे सत्र कायम ठेवले आहे. त्यामुळे पोलिसांची मॉर्निंग वॉक पथके अॅक्टीव होणार की नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.