उपचारादरम्यान प्रवाशाचा मृत्यू
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसचालकाच्या बेदरकारपणामुळे प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे. बसमध्ये प्रवेश करीत असताना चालकाने अचानकपणे गाडी दामटली. त्यामुळे गाडीचे चाक प्रवाशाच्या मांडीवरून गेल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा अपघात ३० एप्रिलला हडपसरधमील गाडीतळ परिसरात घडला होता. प्रकाश रामभाउ गायकवाड वय ५६ रा. माउलीनगर, नाळवंडी रोड, बीड असे ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. बाळासाहेब गायकवाड (वय ३३ रा. नाळवंडी रोड, बीड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शतपावली करणार्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बाळासाहेब गायकवाड यांचे वडील प्रकाश हे पुण्यात आले होते. ३० एप्रिलला ते हडपसर गाडीतळ परिसरातील पीएमपीएल बसथांब्यातून गाडीत बसण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी चालकाने अचानकपणे पीएमपीएल बस दामटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बसचे चाक प्रकाश यांच्या मांडीवरून गेल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानुसार याप्रकरणी संबंधित बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख हे तपास करीत आहेत.
पीएमपीएल बसचालकांना सुसाटपणा जोरात
शहराची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिहवन महामंडळ अर्थात पीएमपीएल बस चालकांचा सुसाटपणा प्रवाशांच्या जीवावर येत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने मध्यवर्ती शहरातून वाहतूक करताना वेगाची मर्यादा न पाळणे, बसस्थानकजवळ वेगाने गाडी आणणे, प्रवाशी बसण्याआधीच बस मार्गस्थ करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे पीएमपीएल महामंडळाकून संबंधित वाहन चालकांना कानपिचक्या देण्याची आवश्यकता आहे.