राणा सूर्यवंशी यांची सुरक्षा जैसे थे, विद्यानंद बापट यांचीही सुरक्षा काढली
marathinews24.com
पुणे – Pune Police News : शहरातील विविध भागात वास्तव्य करणार्या महत्वाच्या व्यक्तींना पुणे पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. दरम्यान, संबंधितांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आल्यानंतर २० जणांना पोलीस सुरक्षा आवश्यक नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार डीजे वादनाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यासह २० महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांना पोलीस सुरक्षा गरजेची नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, उद्योजक राणा सूर्यवंशी यांची पोलीस सुरक्षा जैसे थे ठेवण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपये – सविस्तर बातमी
पुणे पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आलेल्या व्यक्ती संदर्भात पोलीस संरक्षण गठीत समितीच्या बैठकीत सर्वकष आढावा घेण्यात आला. त्यानुसार २० जणांना पुरवलेली पोलीस सुरक्षा सध्यस्थितीत आवश्यक नसल्याचे स्पष्ट झाले. त्यापार्श्वभूमीवर त्यांची पोलीस सुरक्षितता तात्काळ हटवण्यात आली आहे. (Pune Police News) मात्र, १८ ऑक्टोबरपासून चर्चेत आलेले आणि बारामतीत हल्ला झालेले उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्या सुरक्षितेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यांची सुरक्षा कायम ठेवली असून, वाय प्लस एस्कॉर्ट दर्जाचे संरक्षण त्यांना पुरवण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षा काढलेल्यांमध्ये पुण्यातील काही बांधकाम व्यावसायिकांसह उद्योगपतींचा, राजकीय विश्लेषकांचा समावेश आहे, फिल्म निर्माते यांचाही समावेश आहे.
विद्यानंद बापट यांचे पोलीस संरक्षण हटवले
ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले विद्यानंद बापट यांचेही पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे. गणशोत्सवापुर्वी खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांच्यावर एकाने हल्ला केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना २४ तास पोलीस सुरक्षा दिली होती. दरम्यान, त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात पोलीस आढावा बैठकीत मागोवा घेण्यात आला. त्यानुसार त्यांना आता पोलीस सुरक्षिततेची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार नुकतेच बापट यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे.
संरक्षण देण्याचा अधिकार पोलीस आयुक्तांना
शहरातील महत्वाच्या आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्याचा अधिकार पोलीस आयुक्तांना असतो. त्यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्याकडून संबंधितांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार कोणाला सुरक्षा द्यायची, कोणाची सुरक्षा काढायची, याचा निर्णय दर दोन महिन्यांनी होणार्या बैठकीत घेतला जातो. त्यानुसार २३ ऑक्टोबरला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये पुण्यातील २० जणांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.





















